जळगाव - शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालयात एका महिलेने शुक्रवारी विचित्र शरीररचना असलेल्या बाळाला जन्म दिला. या बाळाच्या शरीराचा आकार हा माशाप्रमाणे होता. शनिवारी दुपारी बाळाचा मृत्यू झाला. दुर्दैवाने या बाळाच्या वाट्याला अवघ्या 12 तासांचे आयुष्य आले. अशा पद्धतीने जन्माला आलेले हे खान्देशातील कदाचित पहिलेच बाळ असेल, असा दावा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केला आहे. दुर्मीळ पद्धतीने जन्मलेल्या या बाळाचा मृतदेह अभ्यासाच्या दृष्टीने शरीररचनाशास्त्र विभागात ठेवण्यात आला आहे.
शरीराची घडण अत्यंत दुर्मीळ
जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील एका गावातील महिलेला शुक्रवारी दुपारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले होते. दुपारी 4 वाजता महिलेला प्रसूती कळा सुरू झाल्यानंतर स्त्रीरोग विभागप्रमुख डॉ. संजय बनसोडे आणि डॉक्टरांनी या महिलेची प्रसूती केली. प्रसूती होत असताच एका विचित्र घटनेचा प्रत्यय डॉक्टरांना आला. या बाळाच्या शरीराची घडण अत्यंत दुर्मीळ असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. प्रसूतीपूर्वी या महिलेवर स्थानिक पातळीवर उपचारही सुरू होते. शिवाय वेळोवेळी सोनोग्राफीही करण्यात आली होती. मात्र, त्यात बाळाच्या शारीरिक व्यंगाविषयी काहीही समोर आले नव्हते. मात्र, बाळाचा जन्म झाल्यानंतर त्याच्या शरीराचा आकार एखाद्या माशाप्रमाणे असल्याचे दिसून आले.