जळगाव- कोरोना विषाणूला अटकाव करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सर्वसामान्य नागरिकांसह नेते मंडळींनी आपल्या घरात दिवे लावत पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला साथ दिली. दरम्यान, शहरातील एका नगरसेवकाने पुढाकार घेऊन अनोख्या पद्धतीने मोदींच्या आवाहनाला आपला पाठींबा दर्शवला. नगरसेवकाने भारताच्या प्रतिमेत दिवे लावले. या आगळ्यावेगळ्या उपक्रमाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी देशवासीयांना रविवारी रात्री ९ वाजता घरातील विजेचे दिवे बंद करून ९ मिनिटे तेलाचे दिवे, मेणबत्ती लावण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत दिवे, मेणबत्त्या लावल्या. ज्यांना दिवे किंवा मेणबत्ती लावणे शक्य नव्हते अशा नागरिकांनी मोबाईलचे टॉर्च लावले होते.