जळगाव A Boon For Farmers : शेतकऱ्याला नेहमी अस्मानी आणि सुलतानी संकटाला सामोरं जावं लागतं. कधी अतिवृष्टीमुळं शेतकऱ्याचं नुकसान होतं तर कधी पाऊस नसल्यामुळं पिकांना वाचवण्यासाठी शेतकऱ्याला धडपड करावी लागते (grow crop in uncertainty of rain). शेतकऱ्याची ही धडपड लक्षात घेता यावर जळगावातील चाळीसगाव तालुक्यातील ब्राह्मणशेवगे येथील एका शेतकरी कुटुंबातील तरुणानं एक संशोधन केलंय. पाण्याशिवायही दोन महिने पिकं तग धरू शकतील अशी एक विशिष्ट जैविक पावडर त्यानं उत्पादित केली असून, ही जैविक पावडर पेरणीच्या वेळी बियाण्यासोबत मिश्रण केल्यानंतर संबंधित पिकाला दीड ते दोन महिने पाण्याची गरज लागत नाही असं संशाधन या तरुण शेतकऱ्यानं केलंय. विशेष म्हणजे तरुणाच्या या संशोधन प्रकल्पाला पेटंट मिळालं असून दुष्काळी परिस्थितीत पाण्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांना पिकांसाठी हे संशाधन वरदान ठरणारं आहे. प्रकाश पवार असं या तरुण शेतकऱ्याचं नाव आहे.
दोन महिने पाण्याशिवाय राहू शकतील पिकं : ब्राह्मणशेवगे येथील प्रकाश सुनील पवार हे सामान्य शेतकरी कुटुंबातील आहेत. वडील अल्पभूधारक शेतकरी तर आई गावातच आशा सेविका म्हणून कार्यरत आहे. शेतकऱ्यांना नेहमी वेगवेगळ्या संकटांना सामोरं जावं लागतं. अनेक भागांमध्ये पाऊस कमी झाल्यामुळं पाण्याअभावी पिकांची वाढ खुंटते व मोठ्या नुकसानाला शेतकऱ्यांना सामोरं जावं लागतं. यावर उपाय म्हणून प्रकाश पवार यांनी या अनोख्या संशोधनाला सुरुवात केली. यात त्यांना यशही मिळालं. प्रकाश पवारांनी केलेलं हे अनोखं संशोधन शेतकऱ्यांना नक्कीच उपयुक्त ठरणारं असून पिकांना जीवनदान देणारं आहे. पीक लागवडीपासून साधारण दोन महिने जरी पिकाला पाणी मिळालं नाही, तरी पीक तग धरू शकतं, अशी एक विशिष्ट जैविक पावडर प्रकाश पवारांनी उत्पादित केलीय. या संशोधनामुळं शेतकऱ्यांना आता पावसाची चिंता करावी लागणार नाही. विशेष म्हणजे या संशोधनासाठी त्यांना २० वर्षांसाठी बौध्दिक संपदा अधिकारही प्राप्त झाले आहेत.