जळगाव -जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्रात मात्र, ६६० मेगावॅट क्षमतेचा सुपर क्रिटीकल प्रकल्प साकारला जात आहे. येत्या वर्षभरात हा प्रकल्प पूर्ण होण्याची अपेक्षा असून, तो कार्यान्वित झाल्यानंतर दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्रात २४ तासात १८०० मेगावॅटपेक्षा अधिक वीजनिर्मिती शक्य होणार आहे. विशेष म्हणजे, या प्रकल्पात सुपर क्रिटीकल तंत्रज्ञान असल्याने वीजनिर्मिती प्रक्रियेत प्रदूषणाचा स्तर घटणार आहे. राज्यातील काही औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पांमध्ये खर्च व उत्पादनाचा ताळमेळ साधण्यासाठी कसरत करावी लागत असताना दीपनगरात नवा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आकारास येत असल्याने या वीजनिर्मिती केंद्राचे वेगळेपण उठून दिसणारे आहे.
सद्यस्थितीत होतेय १२०० मेगावॅट वीजनिर्मिती
सध्या दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील संच क्रमांक ३, ४ व ५मधून ११०० ते १२०० मेगावॅटची वीजनिर्मिती करण्यात येत आहे. भविष्यात याठिकाणी ६६० मेगावॅट क्षमतेचा सुपर क्रिटीकल प्रकल्प कार्यान्वित झाल्यास केंद्राची वीजनिर्मिती क्षमता वाढणार आहे. काही दिवसांपूर्वी खर्चाचा विचार करता येथील संच क्रमांक ३मधून वीजनिर्मिती थांबविण्यात आली होती. त्यानंतर कोरोना काळात टाळेबंदी असल्याने विजेची मागणी घटली होती. म्हणून फक्त संच क्रमांक ४ व ५मधून वीजनिर्मिती सुरू होती. परंतु, टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर राज्यभरात विजेची मागणी अचानकपणे वाढली त्यामुळे संच क्रमांक ३मधून पुन्हा वीजनिर्मिती सुरू करण्यात आली.१९६८मध्ये झाली होती पहिल्या संचाची मुहूर्तमेढ-दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्रासाठी जुलै १९६८मध्ये ६५ मेगावॅट स्थापित क्षमतेचा संच क्रमांक एकची मुहूर्तमेढ रोवली गेली. विदर्भ वगळता खान्देशात सर्वप्रथम वीजनिर्मितीचा बहूमान यानिमित्ताने भुसावळला मिळाला. त्यानंतर ऑगस्ट १९७९मध्ये २१० मेगावॅट स्थापित क्षमतेचा संच क्रमांक दोन कार्यान्वित झाला. सप्टेंबर १९८२मध्ये २१० मेगावॅट क्षमतेचा संच क्रमांक तीन कार्यान्वित झाला. नोव्हेंबर २०१२ व जानेवारी २०१४मध्ये ५०० मेगावॅटचे दोन संच कार्यान्वित झाल्याने दीपनगरची स्थापित क्षमता १४२० मेगावॅट झाली होती. मात्र, मागील काळात ६५ मेगावॅटचा संच क्रमांक एक व २१० मेगावॅट स्थापित क्षमतेचा संच क्रमांक दोन कायमस्वरुपी बंद करण्यात आले. यातील संच क्रमांक १ व २ स्क्रॅप करण्यात आले आहेत. आता प्रत्येकी ५०० मेगावॅटचे संच क्रमांक ४ व ५ सह संच क्रमांक ३ मधून वीजनिर्मिती करण्यात येत आहे. सध्या केंद्राची स्थापित क्षमता १००० मेगावॅटवर आहे. सध्या प्रकल्पात १४०० कायम तर ३ हजार कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत.
'ही' आहेत सुपर क्रिटीकल प्रकल्पाची वैशिष्ट्ये