जळगाव - कोरोना लढ्यात यश मिळवण्यासाठी लसीकरणाची भूमिका खूपच महत्त्वाची असणार आहे, असा वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांचा दावा आहे. मात्र, कोरोनाच्या लसीबाबत अजूनही नागरिकांच्या मनात संभ्रम आहे. म्हणूनच अनेक जण स्वेच्छेने लस घ्यायला पुढे येत नसल्याचे चित्र आहे. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील लिलाबाई शिवराम धनराळे या आजीबाईंनी मनात कोणताही संभ्रम न ठेवता कोविशिल्ड लसीचे दोन्ही डोस घेतलेत. विशेष म्हणजे, त्यांनी वयाची नव्वदी पार केली आहे. लसीकरणाला घाबरणाऱ्या लोकांना त्यांनी एकप्रकारे सामाजिक जबाबदारीचा संदेशच दिला आहे.
वयाची नव्वदी पार केल्यानंतरही जगण्याची महत्त्वाकांक्षा; अमळनेरात 92 वर्षीय आजीने घेतला लसीचा दुसरा डोस
वयाची नव्वदी पार केल्यानंतरही जगण्याची महत्त्वाकांक्षा आहे. अमळनेमध्ये 92 वर्षीय आजीने लसीचा दुसरा डोस घेतला आहे.
लिलाबाई धनराळे, या आजीबाई 92 वर्षांच्या आहेत. अमळनेर शहरातील पटवारी कॉलनी परिसरात त्या राहतात. कोरोनाची लस आल्यानंतरही नागरिकांच्या मनात किंतु-परंतु आहे. मात्र, त्यांनी साधारण महिनाभरापूर्वी कोव्हीशिल्ड लसीचा पहिला डोस घेतला होता. त्यानंतर शुक्रवारी दुपारी त्यांनी नियमानुसार लसीचा दुसरा डोसही घेतला. ग्रामीण रुग्णालयाच्या केंद्रावर त्यांनी हा डोस घेतला. त्यांच्या महत्त्वाकांक्षेचे वैद्यकीय अधिकाऱ्यांसह आरोग्य कर्मचाऱ्यांनी कौतुक केले.
आजींना शंभरी पार करायचीय -
लिलाबाई धनराळे यांनी लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर इतर नागरिकांना देखील न घाबरता लस टोचून घेण्याचे आवाहन केले. 'कोरोना आल्यानंतर मलाही त्याची भीती वाटत होती. आता लस आली आहे. म्हणून मी कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता लसीचे दोन्ही डोस टोचून घेतले. आता मला कोरोनाची भीती वाट नाही. मला अजून वयाची शंभरी गाठायची आहे, असेही त्या म्हणाल्या. दरम्यान, लिलाबाई यांच्याप्रमाणे सर्वांनी संभ्रम न बागळता लसीकरणाला प्रतिसाद दिला तर कोरोनाचा प्रादुर्भाव नक्की रोखता येईल, हे मात्र नक्की.