जळगाव -जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रक्रियेत सोमवारी (४ जानेवारी) अर्ज माघारीसाठी शेवटची मुदत होती. शेवटच्या दिवशी माघारीनंतर लढतींचे चित्र स्पष्ट झाले. जिल्ह्यातील ९२ ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली आहे. यात अमळनेर तालुक्यातील सर्वाधिक १५ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. दरम्यान, जिल्ह्यात एकूण किती उमेदवारांनी माघारी घेतली आणि किती उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत, याची एकत्रित आकडेमोड रात्री उशिरापर्यंत सुरू होती, त्यामुळे अखेरची निश्चित आकडेवारी प्राप्त होऊ शकली नाही.
जिल्हाभरातील ७८३ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. यात ३१ रोजी अर्जांची छाननी होऊन १९ हजार ९८३ अर्ज वैध ठरले होते. २ हजार ६७० प्रभागांमध्ये ७ हजार २१३ सदस्य निवडून द्यायचे होते. सोमवारी अर्ज माघारी घेण्याची शेवटची मुदत होती. सोमवारीच उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्यात आले. यात रात्री उशिरापर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात ७ तालुक्यांचे अहवाल प्राप्त झाले होते. उर्वरित ८ तालुक्यांची आकडेमोड रात्री उशिरापर्यंत सुरू होती.