जळगाव -जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. गुरुवारी जिल्ह्यात पुन्हा 5 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने एकूण बाधितांचा आकडा हा 90 वर पोहोचला आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये जळगावसह भुसावळ आणि पाचोरा येथील रहिवासी असलेल्यांचा समावेश आहे. कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत असल्याने प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जळगाव जिल्हा रुग्णालयासह इतर तालुक्यातील कोव्हिड रुग्णालयांमध्ये कोरोना संशयित म्हणून दाखल असलेल्या व्यक्तींचे स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. स्वॅब घेतलेल्या 46 कोरोना संशयित व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल आज जिल्हा रुग्णालयाला प्राप्त झाले आहेत. यापैकी 41 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून 5 व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.