जळगाव- महापालिकेच्या स्थायी समितीच्या ८ सदस्यांची निवड आज दुपारी जाहीर करण्यात आली. त्यात सत्ताधारी भाजपाच्या ७ तर, विरोधी पक्ष शिवसेनेच्या एका सदस्याची निवड करण्यात आली आहे. महापौर भारती सोनवणे यांनी विशेष महासभेत नवनियुक्त सदस्यांच्या नावांची घोषणा केली. स्थायी समितीप्रमाणेच महिला व बालकल्याण समितीच्या ९ सदस्यांची देखील यावेळी निवड करण्यात आली.
महापालिकेच्या स्थायी समितीच्या एकूण १६ सदस्यांपैकी भाजपाच्या विद्यमान सभापती अॅड. शुचिता हाडा यांच्यासह ७, तर शिवसेनेचा एक, असे ८ सदस्य येत्या ३० सप्टेंबरला निवृत्त होत आहेत. त्यांच्या रिक्त जागांवर नव्या ८ सदस्यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीसाठी आज दुपारी महापौर भारती सोनवणे यांनी विशेष महासभा आयोजित केली होती. या सभेपूर्वी पक्षीय बलाबलनुसार त्या-त्या पक्षाच्या गटनेत्यांनी आपल्या इच्छुक सदस्यांची नावे महापौरांकडे सादर केली होती. या नावांची घोषणा महापौर सोनवणे यांनी सभेत केली. ही निवड बिनविरोध पार पडल्याचे जाहीर करण्यात आले. पुढील वर्षभराच्या कालावधीसाठी हे सदस्य कार्यरत असणार आहेत.
भाजपमध्ये उफाळली नाराजी
स्थायी समितीवर प्रतिनिधीत्व करणारे भाजपाचे ७ सदस्य निवृत्त होत असल्याने या रिक्त जागांसाठी संधी मिळण्यासाठी भाजपामधील अनेक नगरसेवक इच्छुक होते. अनेकांनी पक्षश्रेष्ठींकडे तशी इच्छाही बोलून दाखवली होती. काही सदस्यांना पक्षश्रेष्ठींनी शब्दही दिला होता. पण, बुधवारी ऐनवेळी दुसऱ्याच सदस्यांची वर्णी लागल्याने भाजपामधील नाराजी उफाळून आली. अनेकांनी या निवड प्रक्रियेनंतर पक्षश्रेष्ठींकडे नाराजी बोलून दाखवली.
नवनियुक्त स्थायी समिती सदस्यांची नावे (भाजप)
सरिता नेरकर, ललित कोल्हे, ज्योती चव्हाण, अमित काळे, कुलभूषण पाटील, उज्वला बेंडाळे, किशोर बाविस्कर.
नवनियुक्त स्थायी समिती सदस्यांची नावे (शिवसेना)
प्रशांत नाईक.