जळगाव- एका ६० वर्षीय नराधम वृद्धाने ५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना रविवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास जळगावात घडली. रवींद्र पुना रंधे (वय ६०, रा. जळगाव) असे गैरकृत्य करणाऱ्या नराधमाचे नाव आहे. दरम्यान, याप्रकरणी संशयित आरोपी असलेल्या रंधेवर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
या प्रकरणातील पीडित मुलगी ही कुत्र्यांच्या पिलांसोबत खेळत होती. यावेळी संशयित आरोपी रवींद्र रंधे याने तिला गोड बोलून त्याच्या घरात नेले. घरात त्याने तिच्यावर अत्याचार केले. या प्रकारानंतर पीडित मुलगी तिच्या घरी आली. तिला त्रास होत असल्याने तिने घडलेल्या प्रकाराबाबत आजीला माहिती दिली. मुलीवर अत्याचार झाल्याची खात्री होताच तिच्या कुटुंबीयांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी पीडितेच्या आजीने दिलेल्या तक्रारीवरून संशयित रवींद्र रंधे याच्याविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला.