जळगाव -जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. मात्र, अशा परिस्थितीत जिल्हावासीयांचे मनोबल वाढवणारी एक सुखद बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील वेल्हाणे येथील एका चिमुरड्याच्या जिद्दीपुढे कोरोनाने हार पत्करली आहे. मंगळवारी दुपारी या चिमुकल्याला स्थानिक प्रशासनाने खेळणी, चॉकलेट-बिस्कीट देऊन टाळ्यांच्या गजरात कोविड रुग्णालयातून डिस्चार्ज दिला. पोटाचा गोळा घरी परतत असल्याचे पाहून चिमुरड्याच्या पालकांसह उपस्थित डॉक्टर्स, नर्स यांच्या डोळ्यातून यावेळी आनंदाश्रू वाहत होते.
वेल्हाणे येथील एका सहा वर्षाच्या चिमुरड्यास कोरोनाची लागण झाली होती. मुंबई येथून कुटुंबासोबत गावी परत येताना नंदुरबार येथील चार कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आल्याने त्याला कोरोनाची लागण झाली होती. त्याचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह असल्याने त्याच्यावर पारोळा येथील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू होते. कोरोनावर मात केल्याने त्यास मंगळवारी डिस्चार्ज देण्यात आला. स्थानिक प्रशासनाने टाळ्या वाजवून, पुष्पवृष्टी करत, खेळणी आणि चॉकलेट-बिस्कीट देऊन त्याला पालकांसोबत घरी सोडले.