जळगाव -जळगाव महापालिकेच्या पाठोपाठ जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथील नगरपंचायतीच्या राजकारणात भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुक्ताईनगरात सत्ताधारी भाजपचे 6 नगरसेवक लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची समोर येत आहे. हा भाजपसाठी दुसरा मोठा धक्का मानला जात आहे.
मुक्ताईनगर नगरपंचायतीमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळालेले आहे. येथील नगराध्यक्षा नजमा तडवी यांच्यासह सत्ताधारी गटातील नगरसेवक हे खडसे गटाचे समर्थक आहेत. मात्र, अलीकडच्या काळात सत्ताधारी गटात कुरबुरी सुरू झाल्या होत्या. दोन दिवसांपूर्वी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या निधीतून मंजूर करण्यात आलेल्या कामांना बहुमताने मंजुरी देण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. नगराध्यक्षांसह 6 नगरसेवकांनी शिवसेनेला साथ दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपही केले होते.
हेही वाचा -सुपरमुनचे संपूर्ण देशात मनोहारी दर्शन; नेहरू विज्ञान केंद्राच्या ऑनलाईन कार्यक्रमातही दिसणार
आज नगरसेवकांचा शिवसेना प्रवेश?
आज मुक्ताईनगर नगरपंचायतीचे 6 नगरसेवक हे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून मुंबईत मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश घेणार असल्याची माहिती मिळत आहे. याप्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचीही उपस्थिती राहणार आहे. दरम्यान, मुक्ताईनगरात घडणाऱ्या घडामोडींमुळे राजकारणाची सूत्रे पूर्णपणे बदलणार आहेत.