जळगाव -शहरातील जुने जळगाव परिसरातील आंबेडकर नगरात एका 55 वर्षीय प्रौढाची अज्ञात व्यक्तींनी निर्घृणपणे हत्या केली आहे. ही घटना रविवारी रात्री उशिरा घडली असून, ती आज (सोमवारी) सकाळी उजेडात आली. राजू पंडित सोनवणे (वय 55, रा. लक्ष्मीनगर, जळगाव) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
याबाबत माहिती देताना अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी काय आहे प्राथमिक माहिती?
राजू सोनवणे हे रिक्षा चालक होते. ते पत्नी आणि 2 मुलांसह शहरातील लक्ष्मी नगरात 15 वर्षांपासून राहत होते. जुने जळगाव परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भवनासमोर त्यांची आई धृपताबाई आणि पुतण्या विशाल सोनवणे राहतात. रविवारी रात्री ते आईला भेटायला आंबेडकर नगरातील घरी आले होते. रात्री याठिकाणीच ते मुक्कामी थांबले होते. रात्री राजू यांची आई धृपताबाई आणि पुतण्या विशाल सोनवणे घरी होते. राजू सोनवणे रात्री घराच्या वरील मजल्यावर झोपायला गेले. त्यांची आई व पुतण्या खालच्या खोलीत झोपले होते. सोमवारी सकाळी 8.30 वाजले तरी राजू सोनवणे झोपेतून उठून खाली आले नाहीत. म्हणून त्यांचे कुटुंबीय वरच्या खोलीत पाहायला गेले असता हत्येचा प्रकार उजेडात आला.
हेही वाचा -जळगावात राष्ट्रवादीमध्ये उफाळली 'भाऊबंदकी'; महानगराध्यक्ष, 12 फ्रंटल अध्यक्षांसह 300 कार्यकर्त्यांचे एकाच वेळी राजीनामे!
डोक्यावर धारदार शस्त्राने वार -
मारेकऱ्यांनी राजू सोनवणे यांच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार केले आहेत. अतिरक्तस्त्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शनिपेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
पूर्ववैमनस्यातून हत्येचा संशय -
राजू सोनवणे यांची हत्या कोणी व का केली? याचे कारण स्पष्ट झालेले नाही. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला आहे. या प्रकरणी तपास सुरू असून, अद्याप कुणालाही संशयित म्हणून अटक केलेली नाही, अशी माहिती अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी दिली. दरम्यान, पूर्ववैमनस्यातून त्यांची हत्या झाली असावी, असा पोलिसांना संशय असून, त्या दृष्टीने पोलीस तपास करत आहेत. पोलिसांनी सोनवणे यांच्या कुटुंबीयांसह आजूबाजूला राहणाऱ्या लोकांचे जाबजबाब नोंदवले आहेत. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.