जळगाव - शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, म्हणजेच जिल्हा कोविड रुग्णालयात एका कोरोना संशयित रुग्णाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना कोव्हिड रुग्णालयातील वाॅर्ड क्रमांक 6 मध्ये गुरुवारी मध्यरात्रीनंतर साधारण 1 वाजताच्या सुमारास घडली. मृत व्यक्ती जामनेर तालुक्यातील पहूर येथील रहिवासी आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी संबंधित व्यक्तीची प्रकृती बिघडली होती. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने पहूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याठिकाणी खबरदारी म्हणून त्यांची कोरोनासाठी अँटीजेन चाचणी करण्यात आली होती. या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला होता. परंतु, त्रास जाणवत असल्याने त्यांना कोरोनाच्या आरटीपीसीआर चाचणीसाठी जळगाव येथे कोविड रुग्णालयात हलविण्यात आले होते. 9 सप्टेंबर रोजी त्यांना पहुरच्या ग्रामीण रुग्णालयातून जळगाव येथील कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर वॉर्ड क्रमांक 6 मध्ये उपचार सुरू होते. 10 सप्टेंबर रोजी त्यांचे आरटीपीसीआर चाचणीसाठी स्त्राव घेण्यात आले होते. मात्र, त्यांचा अहवाल प्राप्त होण्यापूर्वीच त्यांनी गुरुवारी मध्यरात्रीनंतर गळफास घेत आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.