जळगाव -जिल्ह्यासाठी सोमवार हा अपघातवार ठरला. जिल्ह्यात ठिकठिकाणी झालेल्या ५ अपघातांमध्ये ५ जणांचा बळी गेला आहे. तर ३ जण जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे, यातील ३ अपघातांना जिल्ह्यातील वाळू वाहतूक कारणीभूत ठरली आहे. भरधाव डंपरद्वारे होणारी वाळू वाहतूक जिल्हावासीयांच्या जीवावर उठली आहे. जळगाव, भुसावळ, चोपडा व यावल तालुक्यात हे अपघात झाले आहेत.
उभ्या तरुणास डंपरने चिरडले -
रिक्षातून खाली उतरून रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तरुणास वाळुने भरलेल्या भरधाव डंपरने चिरडले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. सोमवारी सकाळी ११.३० वाजता जळगाव तालुक्यातील कुसुंबा गावाच्या बसस्थानकाजवळ हा अपघात झाला. ईश्वर उर्फ नथ्थु रतन मिस्तरी (वय ३५, रा.कुसुंबा) असे मृत तरुणाचे नाव आहे. ईश्वर हा एमआयडीसीत एका चटईच्या कंपनीत कामास होता. सोमवारी तो कामाच्या निमित्ताने जळगावात आला. यानंतर रिक्षाने पुन्हा कुसुंबा येथे गेला होता. रिक्षातून खाली उतरुन रस्त्याच्या कडेला उभा असताना भरधाव डंपरने त्याला धडक दिली. डंपरचे चाक डोक्यावरुन गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला होता. या अपघातानंतर डंपरचालक भगवान सोमा सोनवणे (वय ४२, रा. बांभोरी) हा पसार झाला होता. अपघातानंतर संतप्त नागरिकांनी डंपरच्या काचा फोडून ते पेटवण्याचा प्रयत्न केला. नागरिकांनी अवैध वाळू वाहतुकीच्या विरोधात प्रचंड घोषणा देत संताप व्यक्त केला. मृत ईश्वर याची पत्नी शीतल ही जामनेर येथे माहेरी गेली होती. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर तिच्यासह नातेवाईकांनी कुसुंबा गावाकडे धाव घेतली. मिस्तरी दाम्पत्यास करण (वय १०), हितेश (वय ८) व निशा (वय ६) अशी ३ मुले आहेत.
डंपरच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू -
भुसावळ तालुक्यातील कुऱ्हा पानाचे येथे भरधाव डंपरच्या धडकेत ६५ वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. प्रल्हाद तुळशिराम पाटील (६५) असे या मृत वृद्धाचे नाव आहे. प्रल्हाद पाटील व त्यांचा मुलगा किशोर पाटील हे दोघे आज सकाळी त्यांच्या शेतात पायी जात होते. गावाजवळील कुर्हे-बोदवड रस्त्यावरील मारोती मंदिरापुढे कुर्हे गावाकडे येणारा भरधाव डंपर (एम.एच.१९ झेड.४४२७) ने प्रल्हाद पाटील जोरदार धडक दिली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर घटनास्थळावरून डंपर चालक वाहन सोडून पसार झाला. अपघात प्रकरणी किरण प्रल्हाद पाटील (कुर्हेपानाचे) यांच्या फिर्यादीनुसार आरोपी डंपर चालक मयूर गंगाधर फालक (साकेगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीसह डंपर तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
हेही वाचा -लोकलच्या गर्दीचा आणखी एक बळी! २२ वर्षीय तरुणीचा धावत्या लोकलमधून पडून मृत्यू