जळगाव - भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यातील हाडवैर सर्वश्रुत आहे. दोघांमधील वर्चस्ववादामुळे जिल्ह्यात भाजप कार्यकर्त्यांचे २ गट पडले आहे. दोन्ही गटांकडून नेहमी एकमेकांवर कुरघोड्या सुरू असतात. तर, वरणगाव नगरपालिकेतही असाच काहिसा प्रकार घडला आहे. अडीच वर्षांपूर्वी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीवेळी महाजन समर्थक असलेल्या गटनेत्याने काढलेला व्हीप झुगारल्याने खडसे गटाचे ५ नगरसेवक अपात्र झाले आहे. हा खडसे गटाला मोठा धक्का मानला जात आहे.
औरंगाबाद खंडपिठाच्या निर्णयानंतर जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांनी हा निकाल दिला आहे. अपात्र झालेल्या नगरसेवकांमध्ये खडसे गटाचे अरुणा इंगळे, रोहिणी जावळे, जागृती बढे, नितीन माळी आणि विकीन भंगाळे यांचा समावेश आहे. १८ पैकी ८ नगरसेवक असलेल्या भाजपने अपक्षांच्या मदतीने वरणगाव नगरपालिकेची सत्ता काबीज केली आहे.
हेही वाचा - गिरीश महाजनांचे जेवढं वय, तेवढा शरद पवारांचा राजकारणात अनुभव - रवींद्र पाटील
यानंतर दुसऱ्या अडीच वर्षांसाठी नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपमध्ये २ गट पडले होते. २७ नोव्हेंबर २०१७ ला निवड प्रक्रिया असल्याने भाजपचे गटनेते सुनील काळे यांनी २३ नोव्हेंबर २०१७ ला नगराध्यक्षपदासाठी स्वतःचा तर, उपनगराध्यक्ष पदासाठी शेख अखलाक यांच्या मतदानासाठी भाजपच्या नगरसेवकांना व्हीप बजावला होता. मात्र, व्हीप काढताना विश्वासात घेतले नाही, म्हणून भाजपचे दुसरे नगरसेवक नितीन माळी, रोहिणी जावळे, अरुण इंगळे, जागृती बढे तसेच विकीन भंगाळे यांनी गटनेता बदलीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज केला होता. त्यांच्या शिफारशीनुसार नितीन माळी गटनेते झाले. माळी यांनी नगराध्यक्ष पदासाठी रोहिणी जावळे तर उपनगराध्यक्ष पदासाठी गणेश धनगर यांना मतदानाचा हक्क बजावला. प्रत्यक्षात मतदानावेळी भाजपच्या ८ पैकी तिघांनी सुनील काळे यांना तर ५ नगरसेवकांनी रोहिणी जावळे यांना मतदान केले. परंतु, अपक्ष व राष्ट्रवादीच्या मदतीने सुनील काळे यांना ११ तर रोहिणी जावळे यांना भाजपची ५ आणि अपक्षांची ३ अशी ८ मते पडली. त्यामुळे काळे नगराध्यक्ष झाले.