जळगाव- येथील लोकसभा मतदारसंघातील भडगाव शहरात असलेल्या मतदान केंद्र क्रमांक १०७ वर आज फेरमतदान घेण्यात आले. सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत एकूण ४८.४४ टक्के मतदान झाल्याची माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र कचरे यांनी दिली.
भडगावात फेरमतदानात ४८.४४ टक्के मतदान लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात १८ एप्रिलला भडगाव शहरातील मतदान केंद्र क्रमांक १०७ वर मतदानाची प्रक्रिया पार पडली होती. मात्र, त्यावेळी मॉकपोल प्रक्रियेची ५३ मते डिलिट न करताच प्रत्यक्ष मतदान घेण्यात आले होते. त्यामुळे एकूण मतदानापेक्षा ५३ मते अतिरिक्त आढळली होती. हा प्रकार समोर आल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी याबाबतचा अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवला होता.
त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने या मतदान केंद्रावर फेरमतदान घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आज लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात फेरमतदान घेण्यात आले. या मतदान केंद्रांतर्गत पुरुष मतदार ६९०, स्त्री मतदार ६५२ असे एकूण १३४२ मतदार होते. यापैकी ३५४ पुरुष मतदार, २९६ स्त्री मतदार असे एकूण ६५० मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. एकूण मतदानाची टक्केवारी ४८.४४ टक्के आहे.
आज सकाळी ६ वाजता मॉकपोल घेण्यात आला. त्यानंतर सकाळी ७ वाजता मतदानास सुरूवात झाल्यानंतर अवघ्या २ तासात म्हणजे सकाळी ९ वाजेपर्यंत ९ टक्के मतदान झाले. यानंतर सकाळी ११ वाजेपर्यंत २१.२४ टक्के, दुपारी १ वाजेपर्यंत २८.४६ टक्के, दुपारी ३ वाजेपर्यंत ३४.५८ टक्के, सायंकाळी ५ वाजेपर्यंत ४३.८२ आणि सायंकाळी ६ वाजेपर्यंत एकूण ४८.४४ टक्के मतदान झाले. दिवसभर ही मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.