महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा कहर; 12 दिवसातच 47 रुग्णांचा मृत्यू! - corona patient deaths in Jalgaon

कोरोनाची दुसरी लाट ही आधी उसळलेल्या लाटेपेक्षा अधिक वेगाने संसर्ग करणारी असली तरी तिची तीव्रता म्हणजेच हानिकारकता तुलनेने कमी असेल, असा दावा वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी केला आहे. परंतु, जळगाव जिल्ह्यातील सध्याच्या परिस्थितीचा विचार केला तर वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांचे अंदाज चुकले आहेत

Jalgaon corona update
जळगाव कोरोना अपडेट

By

Published : Mar 13, 2021, 9:44 PM IST

Updated : Mar 13, 2021, 10:37 PM IST

जळगाव -जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट उसळली असली आहे. कोरोना अधिक तीव्रतेने हातपाय पसरत आहे. मोठ्या संख्येने आढळणाऱ्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ही एकीकडे आरोग्य यंत्रणेसाठी डोकेदुखी ठरत असताना दुसरीकडे कोरोनामुळे जाणारे बळी रोखण्याचे आव्हानही आरोग्य यंत्रणेला पेलावे लागत आहे.

कोरोनाची दुसरी लाट ही आधी उसळलेल्या लाटेपेक्षा अधिक वेगाने संसर्ग करणारी असली तरी तिची तीव्रता म्हणजेच हानिकारकता तुलनेने कमी असेल, असा दावा वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी केला आहे. परंतु, जळगाव जिल्ह्यातील सध्याच्या परिस्थितीचा विचार केला तर वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांचे अंदाज चुकले आहेत. जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा कहर अतिशय वेगाने सुरू आहे. गेल्या 12 दिवसात तब्बल 47 रुग्णांचा बळी गेला आहे.

जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा कहर


हेही वाचा-रतन टाटांनी घेतली कोरोना लस

जळगाव जिल्ह्यात मागील वर्षी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून कोरोनाचा संसर्ग वाढायला लागला. या काळात कोरोनाचा संसर्ग जसजसा वाढत गेला तसा कोरोनाच्या बळींचा आकडाही वाढत गेला. तेव्हा जळगाव जिल्ह्यातील कोरोनाचा मृत्यूदर हा देशात सर्वाधिक म्हणजेच एकूण पॉझिटिव्हिटीच्या तुलनेत 13 टक्के इतका मोठा होता. सलग तीन महिने हीच परिस्थिती कायम होती. नंतर आरोग्य यंत्रणेच्यावतीने शर्थीचे प्रयत्न करून मृत्यूदर नियंत्रणात आला. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात कोरोना संसर्गाचा वेग मंदावल्यानंतर मृत्यूदरही अडीच ते तीन टक्क्यांपर्यंत खाली आला. मध्यंतरी जिल्ह्यातील मृत्यूदर हा 2.38 टक्क्यांवर स्थिर होता. आता मात्र, जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट धडकल्यानंतर मृत्यूदर पुन्हा वाढत असून ही धोक्याची बाब मानली जात आहे.

हेही वाचा-...तर ताकदीने बेळगावात उतरावे लागेल, संजय राऊत यांचा इशारा

गेल्या 5 दिवसांत 28 जणांनी गमावला जीव-

जळगाव जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट धडकली आहे. ही लाट वेगाने संसर्ग करणारी तर आहे. त्याचबरोबर बाधितांच्या मृत्यूचे प्रमाण देखील वाढले आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा अक्षरशः हतबल झाली आहे. जिल्ह्यात गेल्या 5 दिवसात तब्बल 28 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. महिनाभरापासून जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या सातत्याने वाढतच चालली आहे. दररोज हजाराच्या उंबरठ्यावर नवे पॉझिटिव्ह रुग्ण समोर येत आहेत. दुसरी लाट सुरू होण्यापूर्वी कोरोनाचे गांभीर्य कमी झाले. त्यामुळे नागरिकांचा हलगर्जीपणा वाढला. परिणामी कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. कुटुंबच्या कुटुंब संसर्गग्रस्त होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे समोर येत आहे.

हेही वाचा-चिंताजनक..! नागपुरात नवीन वर्षात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा मोठा

12 दिवसात 40 पुरुष, 7 महिलांचा मृत्यू-

1 मार्चपासूनच्या जिल्ह्यातील कोरोनाच्या मृत्यूच्या आकडेवारीवर एक नजर टाकली तर ती अतिशय धक्कादायक आणि चिंता वाढवणारी आहे. गेल्या 12 दिवसांत कोरोनाने 47 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात 40 पुरुषांचा तर 7 महिलांचा समावेश आहे. चिंतेची बाब म्हणजे, मृतांमध्ये तरुणांची संख्याही लक्षणीय आहे. 1 मार्चपासूनच्या 12 दिवसांपैकी 7 दिवस मृतांचे आकडे 5 किंवा त्यापेक्षा जास्त आहेत. 3, 5, 9 आणि 12 मार्चला प्रत्येकी 5 जणांनी प्राण गमावले आहेत. 8, 10 आणि 11 या तारखांना मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 6 इतकी आहे.

सध्या जळगाव जिल्ह्यातील मृत्यूदर हा 2.21 असा नियंत्रणात दिसत असला तरी ती तुलना एकूण रुग्णसंख्येशी असल्याने मृत्यूदराबाबत संभ्रम वाटतो. वाढत जाणाऱ्या मृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणेला अधिक परिश्रम करण्याची गरज आहे.

जिल्ह्यातील सर्वाधिक मृत्यू जळगावात-

जळगाव शहर हे कोरोनाचे जिल्ह्यातील प्रमुख हॉटस्पॉट आहे. याठिकाणी सर्वाधिक गंभीर परिस्थिती आहे. जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या एकूण 1 हजार 432 मृत्यूपैकी सर्वाधिक 324 मृत्यू हे एकट्या जळगाव शहरात झाले आहेत. जळगावात आतापर्यंत 18 हजार 234 जणांना कोरोनाची लागण झाली. त्यातील 15 हजार 212 जणांनी कोरोनाला हरविले. सध्या 2 हजार 698 कोरोनाग्रस्त रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जळगाव शहराप्रमाणे भुसावळ तालुक्यात 208, रावेरात 104, अमळनेरात 103 जळगाव ग्रामीण व चोपडा तालुक्यात प्रत्येकी 85, पाचोरा 75, भडगाव 45, धरणगाव 52, यावल 70, एरंडोल 50, जामनेर 76, पारोळा 18, चाळीसगाव 83, मुक्ताईनगर 37 आणि बोदवड तालुक्यात 17 जणांचा मृत्यू झाला आहे.

'ही' आहेत मृत्यूदरवाढीची कारणे-

जिल्ह्यातील वाढत्या मृत्यूदराबाबत 'ईटीव्ही भारत'शी बोलताना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी सांगितले की, जिल्ह्यात सध्या कोरोनाची दुसरी लाट आली आहे. ही लाट नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे तीव्र होत चालली आहे. या लाटेत रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणदेखील वाढत आहे, हे खरे आहे. मात्र, ज्या रुग्णांचे मृत्यू होत आहेत. विविध गंभीर रोग असलेल्या रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक आहे. हे रुग्ण वेळेत उपचार घेण्यात हलगर्जीपणा करत असल्याने त्यांचा मृत्यू होत आहे. कोरोनाची लक्षणे दिसूनही चाचणीला विलंब करणे, चाचणी केल्यानंतर कोरोनाची लागण झाल्याचे समोर येऊनही योग्य उपचार घेण्याकडे दुर्लक्ष करणे, प्रकृती चिंताजनक झाल्यावर रुग्णालयात दाखल होणे, अशा परिस्थितीत श्वसनसंस्थेवर परिणाम होऊन रुग्णाचा जीव वाचवण्यात अपयश येते. याच प्रमुख कारणांमुळे जिल्ह्यातील मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. हे प्रमाण कमी करायचे असेल तर नागरिकांनी लक्षणे दिसून येताच उपचार घ्यायला हवा, असे डॉ. नागोराव चव्हाण म्हणाले.

सक्रिय रुग्णसंख्येत जळगाव जिल्हा देशात 'टॉप टेन'मध्ये-

कोरोना संसर्गाचा विचार केला तर जळगाव जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याची स्थिती आहे. देशभरातील सक्रिय रुग्णसंख्या असलेल्या जिल्ह्यांचा विचार केला तर जळगाव जिल्हा 'टॉप टेन'मध्ये असून जिल्ह्याचा आठवा क्रमांक आहे. सक्रिय रुग्णसंख्येच्या बाबतीत देशातील 'टॉप टेन' जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील तब्बल आठ जिल्ह्यांचा समावेश आहे. या आठ जिल्ह्यांपैकी जळगाव जिल्हा हादेखील एक आहे. सुरुवातीच्या काळात मृत्यूदराच्या बाबतीत देशात पहिल्या क्रमांकावर असलेला जळगाव जिल्हा सक्रिय रुग्णसंख्येच्या बाबतीतही आठव्या क्रमांकावर असून ही चिंतेची बाब आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या सद्यस्थितीत 68 हजार 662 आहे. यातील 60 हजार 515 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर 1 हजार 432 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मध्यंतरी 98 टक्क्यांवर असलेला जिल्ह्यातील रिकव्हरी रेट 88.14 टक्क्यांपर्यंत घसरला आहे.

गेल्या 12 दिवसातील रुग्णांच्या मृत्यूची आकडेवारी अशी-

  • 1 मार्च- 2 पुरुषांचे मृत्यू
  • 2 मार्च- 2 पुरुषांचे मृत्यू
  • 3 मार्च- 4 पुरुष व एका महिलेचा मृत्यू
  • 4 मार्च- 2 पुरुषांचे मृत्यू
  • 5 मार्च- 4 पुरुष व एका महिलेचा मृत्यू
  • 6 मार्च- 2 पुरुषांचे मृत्यू
  • 7 मार्च- एका पुरुषाचा मृत्यू
  • 8 मार्च- 6 पुरुषांचे मृत्यू
  • 9 मार्च- 4 पुरुष व एका महिलेचा मृत्यू
  • 10 मार्च- 4 पुरुष व दोन महिलांचा मृत्यू
  • 11 मार्च- 4 पुरुष व दोन महिलांचा मृत्यू
  • 12 मार्च- 5 पुरुषांचे मृत्यू


Last Updated : Mar 13, 2021, 10:37 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details