जळगाव - जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या रुग्णसंख्येने शनिवारी हजाराचा टप्पा पार केला. जिल्हा प्रशासनाला शनिवारी दुपारी प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये 44 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 1001 इतकी झाली आहे.
जिल्ह्यातील जळगाव शहरासह भुसावळ, अमळनेर, चोपडा आणि रावेर शहरात दररोज मोठ्या संख्येने नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत. जिल्हा प्रशासनाला शनिवारी दुपारी प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये जळगाव शहर 5, भुसावळ 5, अमळनेर 10, चोपडा 9, धरणगाव 4, एरंडोल 1, जामनेर 2, रावेर 6, चाळीसगाव 2, अशा एकूण 44 नव्या पॉझिटिव्ह रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यातील रावेर शहरात देखील कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे. येथील रुग्णसंख्येची वाटचाल देखील शतकाच्या दिशेने सुरू आहे. सद्यस्थितीत रावेरात कोरोनाचे 75 रुग्ण आहेत. बाधितांचा आकडा असाच वाढता राहिला, तर येथेही पॉझिटिव्ह रुग्णसंख्येचे शतक पूर्ण होईल, अशी स्थिती आहे.
जिल्हा प्रशासनाला शनिवारी दुपारपर्यंत दोन टप्प्यात अहवाल प्राप्त झालेत. त्यात सकाळी पहिल्या टप्प्यात प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये 83 अहवाल निगेटिव्ह आले होते. त्यामुळे जिल्ह्याला काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र, हा दिलासा फार काळ टिकला नाही. दुपारी प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये 44 पॉझिटिव्ह रुग्ण समोर आले. दरम्यान, जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी शनिवारी कोरोना रुग्णासंदर्भात नव्याने आदेश जारी केले. कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यास त्याला होम क्वारंटाईन न करता थेट कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात यावे. तसेच यापुढे कोणत्याही व्यक्तीला होम क्वारंटाईन करण्यासाठी जिल्हा प्रशासनाची परवानगी आवश्यक असणार आहे, असे आदेशात नमूद केले आहे.
जिल्ह्यातील कोरोनाची सद्यस्थिती -
जळगाव शहर- 211
भुसावळ- 214
अमळनेर- 153