जळगाव - जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा वेग आता अधिकच वाढला आहे. बुधवारी जिल्ह्यात एकाच दिवशी तब्बल 418 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या आता 8 हजार 605 इतकी झाली आहे. चिंतेची बाब म्हणजे, बुधवारी देखील 12 रुग्णांचा कोरोनाने बळी गेला.
जळगाव जिल्हावासीयांसाठी बुधवारचा दिवस हा चिंता वाढवणारा ठरला. जिल्हा प्रशासनाला बुधवारी रात्री प्राप्त झालेल्या तपासणी अहवालांमध्ये तब्बल 418 कोरोनाबाधित रुग्ण आढळले. सर्वाधिक 121 नवे रुग्ण हे कोरोनाचा जिल्ह्यातील मुख्य हॉटस्पॉट असलेल्या जळगाव शहरात आढळले आहेत. जळगावात आतापर्यंत एकूण 2 हजार 232 रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 83 रुग्णांचा मृत्यू झाला असून 1 हजार 367 रुग्ण हे कोरोनातून बरे झाले आहेत. सद्यस्थितीत जळगावातील 782 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जिल्हा प्रशासनाला बुधवारी रात्री प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये जळगाव ग्रामीण 12, भुसावळ 29, अमळनेर 15, चोपडा 45, पाचोरा 18, भडगाव 2, धरणगाव 25, यावल 16, एरंडोल 10, जामनेर 38, रावेर 33, पारोळा 5, चाळीसगाव 44, मुक्ताईनगर 2, बोदवड 3 असे एकूण 418 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.
हेही वाचा -महाराष्ट्रात कोरोनाचा कहर.! दिवसभरात तब्बल १० हजार ५७६ नव्या रुग्णांची नोंद