जळगाव -अजाणतं वय... त्यातही ती लिव्हर कॅन्सरने ग्रस्त... अशा प्रतिकूल परिस्थितीतही एका चार वर्षीय 'परी'ने कोरोना विरुद्धची लढाई जिंकली आहे. विशेष म्हणजे, कोरोनाची लागण झाल्यानंतर तिची प्रकृती खूपच खालावली होती. असे असताना ती व्हेंटिलेटरशिवाय बरी होऊन घरी परतली आहे. परी अमोल पाटील, असे कोरोनावर मात करणाऱ्या चिमुरडीचे नाव असून, ती जळगाव जिल्ह्यातील भडगाव शहरातील रहिवासी आहे.
भडगाव शहरातील अमोल पाटील यांच्या कुटुंबात पाच जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यात अमोल यांची पत्नी, चार वर्षीय मुलगी परी, आई-वडील आणि भावजयी यांचा समावेश होता. परी अवघ्या चार वर्षांची आणि त्यातही ती लिव्हर कॅन्सरने ग्रस्त आहे. म्हणून पुढे काय होईल, या भीतीपोटी पाटील कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनच सरकली. कोरोनाची लागण झाल्यानंतर परीची प्रकृती झपाट्याने खालावत होती. त्यामुळे कुटुंबीय तिला रुग्णालयात दाखल करण्यासाठी वणवण भटकत होते. अशा परिस्थितीत चाळीसगाव विकास मंच या सेवाभावी संघटनेचे स्वयंसेवक मदतीला धावून आले. संघटनेच्या रुग्णवाहिकेतून परीला रुग्णालयात दाखल करण्यासाठी फिरवाफिरव सुरू होती. पण पाचोरा, भडगाव, चाळीसगाव, जळगाव याठिकाणी बेड मिळाला नाही. अशातच सर्वांच्या मनाची घालमेल वाढत होती.
मन घट्ट करून कुटुंबीय म्हणाले, दादा जीव जाईपर्यंत रुग्णवाहिकेत राहू द्या!
परी लिव्हर कॅन्सरने ग्रस्त असल्याने तिची प्रकृती चिंताजनक होत होती. शिवाय बेड मिळत नसल्याने सर्वांच्या काळजीत भर पडत होती. डॉक्टरांनी देखील ती वाचणे कठीण असल्याचे सांगितले. शेवटी परीचे कुटुंबीय मन घट्ट करून तिचा जीव जाईपर्यंत रुग्णवाहिकेतच राहू द्या, अशी विनंती करत होते. पण चिमुरडी वाचावी म्हणून चाळीसगाव विकास मंचचे संदीप साळुंखे व मनोज पाटील यांनी मुंबईत असणारे प्रफुल्ल साळुंखे यांच्याशी संपर्क केला. पण काही मार्ग निघाला नाही. शेवटी प्रफुल्ल साळुंखे यांनी नाईलाजाने पाचोरा उपजिल्हा रुग्णालयात रुग्णवाहिका उभी करण्यास सांगितले. त्याठिकाणी गेल्यावर वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी परीसाठी स्टोअर रुममध्ये साफसफाई करत तिला स्ट्रेचरवर अॅड्मीट करून घेतले.