जळगाव- विधानसभा निवडणुकीसाठी जळगाव जिल्हा प्रशासन सज्ज आहे. यावेळी जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघातील पुरुष व महिला मतदार मिळून 34 लाख 47 हजार 148 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर सायंकाळी जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन पूर्वतयारीची सविस्तर माहिती दिली. डॉ. ढाकणे पुढे म्हणाले, जळगाव जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदार संघात 17 लाख 96 हजार 326 पुरुष तर 16 लाख 50 हजार 729 स्त्री व इतर 93 असे एकूण 34 लाख 47 हजार 148 मतदार आहेत. त्यात 7 हजार 846 सैनिक मतदार तसेच 14 हजार 852 दिव्यांग मतदार आहेत. जिल्ह्यातील एकूण 3 हजार 586 मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. मतदानाची प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी 6 हजार 513 मतदान यंत्र (बॅलेट युनिट), 44 हजार 430 कंट्रोल युनिट तर 4 हजार 882 व्हीव्हीपॅट यंत्रे प्रशासनाकडे उपलब्ध आहेत. 21 सप्टेंबरपासून निवडणुकीची आदर्श आचारसंहिता संपूर्ण जिल्ह्यात लागू झालेली असल्याने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक भयमुक्त व पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे. आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास तात्काळ गुन्हे दाखल करण्यात येणार असून यासाठी आचारसंहिता पथके तयार करण्यात आली आहेत, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
टोल फ्री दूरध्वनी क्रमांकावर मिळणार माहिती