जळगाव- जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज एकाच दिवशी तब्बल 319 नवे कोरोनाबाधित रुग्ण समोर आले. गेल्या साडेतीन महिन्यानंतर प्रथमच एवढ्या विक्रमी संख्येने नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने आरोग्य यंत्रणेची डोकेदुखी वाढली आहे. आज आढळलेल्या रुग्णांमध्ये तब्बल 158 रुग्ण हे एकट्या जळगाव शहरातील आहेत. त्यामुळे, सद्यस्थितीत जळगाव शहर हे जिल्ह्यातील कोरोनाचे 'हॉटस्पॉट' बनले आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग दिवसागणिक वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. जिल्ह्यात आज कोरोनाबाधित रुग्णसंख्येने त्रिशतक पूर्ण केले. धक्कादायक बाब म्हणजे, आज 4 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला. त्यात जळगाव शहरासह चाळीसगाव तालुक्यातील प्रत्येकी एका वृद्धाचा, तसेच भुसावळ तालुक्यातील एका वृद्धेसह महिलेचा समावेश आहे.
जळगाव, चाळीसगाव 'हॉटस्पॉट'
जळगाव शहर आणि चाळीसगाव तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट आहे. एकट्या जळगाव शहरात आज दीड शतकी नवे कोरोनाबाधित आढळले. त्या खालोखाल चाळीसगाव तालुक्यातील देखील 71 रुग्ण आढळले. अमळनेर आणि चोपडा तालुक्यात देखील पुन्हा एकदा कोरोना डोके वर काढत आहे.
ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे
गेल्या काही दिवसांपूर्वी जिल्ह्याचा रिकव्हरी रेट 97 टक्क्यांच्या घरात जाऊन पोहोचला होता. मात्र, अलीकडे कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढू लागल्याने रिकव्हरी रेट घसरून 95.84 टक्क्यांवर आला आहे. जिल्ह्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या देखील हजारीपार झाली आहे. सध्या जिल्ह्यात 1 हजार 301 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यात 929 रुग्ण हे कोणत्याही प्रकारची लक्षणे नसलेले, तर 372 रुग्ण लक्षणे असलेले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 49 रुग्णांवर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. इतर रुग्णांमध्ये 74 रुग्ण ऑक्सिजन वायू सुरू असलेले आहेत. जिल्ह्यातील परिस्थिती हळूहळू बिकट होत चालली आहे. त्यामुळे, आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.