महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आचारसंहितेमुळे जळगावात ३०० कोटींच्या विकासकामांना ब्रेक - jalgaon

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यामुळे जळगावात अनेक विकासकामे थांबली आहेत. महापालिकेच्या माध्यमातून प्रस्तावित असलेल्या सुमारे ३०० कोटी रुपयांच्या विकासकामांना आचारसंहितेचा अडसर निर्माण झाला आहे.

जळगाव

By

Published : Mar 20, 2019, 5:55 PM IST

Updated : Mar 20, 2019, 11:02 PM IST

जळगाव - लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यामुळे जळगावात अनेक विकासकामे थांबली आहेत. महापालिकेच्या माध्यमातून प्रस्तावित असलेल्या सुमारे ३०० कोटी रुपयांच्या विकासकामांना आचारसंहितेचा अडसर निर्माण झाला आहे. निवडणुकीनंतरच या कामांना मुहूर्त मिळण्याची शक्यता असून तोपर्यंत जळगावकरांना प्रतीक्षा करण्यावाचून दुसरा पर्याय उरलेला नाही.

जळगाव

केंद्रात, राज्यात आणि महापालिकेतही सत्तेत असलेल्या भाजपने गेली आठ महिने केवळ वेळकाढूपणा केल्याचा आरोप करत विरोधकांसह सर्वसामान्य जनतेतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. जळगाव शहरासाठी अमृत योजनेंतर्गत प्रस्तावित असलेले मलनिस्सारण योजनेचे काम तब्बल दीड वर्षांपासून प्रलंबित आहे. फेब्रुवारी २०१९ मध्ये नवीन तंत्रज्ञानानुसार पहिल्या टप्प्याच्या कामाला शासनाने मंजुरी दिली होती. त्यात मूळ अंदाजपत्रकात ५० कोटी रुपयांची वाढ करुन १९६ कोटी रुपयांच्या कामाला शासनाने मंजुरी दिली. मात्र, या योजनेच्या कामाची निविदा अद्याप काढण्यात आली नाही. त्यामुळे हे काम आता आचारसंहितेनंतरच सुरु होणार आहे.

महापालिकेत सत्ता मिळवल्यानंतर भाजपने महिनाभरात १०० कोटी रुपयांचा निधी शासनाकडून आणण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार १६ ऑगस्ट २०१८ रोजी १०० कोटींचा निधी देखील मंजूर झाला. या निधीतून शहरातील पाच मुख्य रस्त्यांची कामे होणार होती. मात्र, सत्ताधाऱ्यांनी या निधीतून होणाऱ्या रस्त्यांच्या कामांचा प्रस्ताव तयार करायला चार महिन्यांचा वेळ वाया घातला. यामुळे प्रस्तावाला शासनाची मंजुरी मिळाली नाही. आता आचारसंहितेमुळे ही कामे रखडणार आहेत.

मे महिन्यात आचारसंहिता संपल्यानंतर १०० कोटी रुपयांच्या निधीतून होणारी रस्त्यांची कामे पुन्हा पावसाळ्यामुळे थांबतील. पुढे विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागली तर रस्त्यांच्या कामांसाठी तब्बल आठ महिने जळगावकरांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.

शहरातून जाणाऱ्या महामार्गाचे चौपदरीकरण असो किंवा शिवाजीनगर रेल्वे उड्डाण पुलाचे नूतनीकरण असो. यासारखी अनेक महत्त्वाची कामे आचारसंहितेच्या कचाट्यात सापडली आहेत. जळगावकरांसाठी जिव्हाळ्याचा विषय असलेली जळगाव ते मुंबई विमानसेवाही आचारसंहितेमुळे लांबणीवर पडली आहे. शासनाच्या उडाण योजनेंतर्गत ही विमानसेवा सुरू झाली होती. परंतु, काही कारणास्तव ती बंद पडली होती. आता 'ट्रू जेट' कंपनीने सेवेसाठी पुढाकार घेतला असताना आचारसंहितेमुळे सेवा सुरू होऊ शकत नाही. आठ महिन्यांचा काळ वाया घालवणारे सत्ताधारी भाजपचे पदाधिकारीच विकासकामे न होण्यास कारणीभूत असल्याची भावना जनतेत आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत दुसरा पर्याय का निवडू नये, अशाही प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

Last Updated : Mar 20, 2019, 11:02 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details