जळगाव -लॉकडाऊनच्या काळात मास्क न लावणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, दुकाने उघडी ठेवणे, गर्दी करणे तसेच इतर कारणांसाठी केलेल्या कारवाईपोटी आतापर्यंत 30 लाख 51 हजार 560 रुपयांचा दंड वसुल करण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी दिली आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी मास्क लावणे बंधनकारक असल्याचे आदेश निर्गमित केले होते. मास्क न वापरणाऱ्या नागरिकाला पाचशे रुपये दंड करण्यात येत आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत मास्क न लावणाऱ्या 1950 व्यक्तींकडून 6 लाख 73 हजार 290 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. तर सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या 341 व्यक्तींकडून 1 लाख 19 हजार रुपये, दुकाने उघडी ठेवणाऱ्या 415 दुकानदारांना 2 लाख 28 हजार 100 रुपये दंड ठोठवण्यात आला. गर्दी करणाऱ्या 576 व्यक्तींकडून 1 लाख 54 हजार 800 रुपये, दुकाने सील केल्यापोटी 317 दुकानदारांकडून 17 लाख 90 हजार 500 रुपये दंड वसूल केला आहे.