जळगाव -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या मालेगाव येथे बंदोबस्ताला गेलेले जळगावातील ३ पोलीस कर्मचारी ड्युटीच्या ठिकाणी गैरहजर आढळून आले होते. या प्रकाराची गंभीर दखल घेऊन पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.
मुक्ताईनगर पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल सुरेश रुपा पवार, जळगाव पोलीस दलाच्या मुख्यालयातील पोलीस कॉन्स्टेबल प्रसाद सुरेश जोशी आणि परवेझ रईस शेख, अशी निलंबित करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
१३ एप्रिल रोजी कोरोनाच्या अनुषंगाने जळगाव जिल्ह्यातून मालेगाव येथे ११० पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी पाठवण्यात आले होते. नाशिक ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकांनी त्यांना मालेगाव येथे विविध ठिकाणी बंदोबस्तासाठी लावले होते. मात्र, नेमून दिलेल्या ड्युटीच्या ठिकाणी जळगावचे पोलीस कर्मचारी गैरहजर राहिले. त्यानुसार नाशिक ग्रामीण पोलिसांनी तसा अहवाल जळगाव पोलीस अधीक्षकांना सादर केला होता. हा अहवाल प्राप्त होताच पोलीस अधीक्षक डॉ. उगले यांनी तातडीने सदर प्रकरणाची चौकशी अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांच्याकडे दिली होती.
सद्यस्थितीत कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत आहे. अशा परिस्थितीत कायदा व सुव्यस्थेची महत्त्वाची जबाबदारी दिलेली असताना या कर्मचाऱ्यांनी कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्याची पूर्वपरवानगी न घेता परस्पर बंदोबस्ताचे ठिकाण सोडले. त्यांनी मालेगाव ते जळगाव असा विनापरवाना प्रवास करुन स्वतःचे आणि त्यांच्या संपर्कात येणाऱ्या इतर लोकांचे आरोग्य धोक्यात टाकल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. तसा चौकशी अहवाल भाग्यश्री नवटके यांनी सादर केला होता. त्यानुसार पोलीस अधीक्षकांनी तिघांना निलंबित केले आहे.