जळगाव- जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या काही केल्या कमी झाली नाही. काल (मंगळवारी) रात्री पुन्हा कोरोनाबाधितांच्या संख्येत ३ रुग्णांची भर पडली. त्यामुळे, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १८३ वर पोहोचली आहे. दरम्यान, मंगळवारी निष्पन्न झालेले तीनही रुग्ण हे जळगाव शहरातील आहेत.
जिल्ह्यात स्वॅब घेतलेल्या १५८ कोरोना संशयित व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल काल (मंगळवारी) रात्री प्राप्त झाले आहेत. यापैकी १५५ व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर, तीन व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेले तीनही व्यक्ती जळगाव शहरातील आहेत. यामध्ये मेहरूण येथील ३३ वर्षीय महिला व १ वर्षीय मुलीचा, तर श्रीधर कॉलनी येथील ६० वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. शहरातील आधीच्या कोरोनाबाधितांच्या संपर्कात आल्याने त्यांना कोरोनाची लागण झाल्याचा अंदाज आहे.