जळगाव -कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी राज्य शासनाने जिल्हा बंदी केली आहे. मात्र, अत्यावश्यक कामानिमित्त अन्य जिल्ह्यात जाण्यासाठी पूर्व परवानगीची सोय शासनातर्फे करण्यात आली. आत्तापर्यंत राज्यातील लाखो नागरिकांनी या ई-पासची सवलत घेत आपला गाव गाठला आहे. जळगाव जिल्हा प्रशासनाने ई-पास सोबतच एक वैद्यकीय दाखला देण्याची सुविधा सुरू केली आहे. आत्तापर्यंत जळगाव शहरातील २९० जणांनी वैद्यकीय तपासणी करून आजारी नसल्याचा दाखल मिळवला आहे.
जळगाव जिल्ह्यातून बाहेर जाण्यासाठी २९० नागरिकांनी मिळवला वैद्यकीय दाखला कोरोना महामारीत सर्वच स्तरावर प्रचंड सतर्कता बाळगली जात आहे. गेले दोन महिने तर एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाणे देखील अवघड झाले होते. मे महिन्यापासून शासनाने अन्य ठिकाणी अडकून पडलेल्या नागरिकांना आपल्या घरी जाण्याचा मार्ग मोकळा करून दिला. त्यामुळे मुंबई, पुण्यासह अन्य जिल्हे व राज्यातून जळगाव शहरात येणाऱ्यांचे प्रमाणही खूप होते.
या दरम्यान, बाहेर गावाहून आलेल्या नागरिकांना महानगरपालिकेच्या केंद्रावर येऊन तपासणी करून घेणे बंधनकारक केले होते. त्यानुसार गेल्या महिन्यात जळगावात दाखल झालेल्या १ हजार २७४ नागरिकांनी तपासणी करून घेतली होती. आता घरी परतलेल्या नागरिकांना पुन्हा आपल्या नोकरीच्या व शिक्षणाच्या ठिकाणी परतायचे आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ई-पास घेण्यात येत आहे. मात्र, हा पास मिळवण्यासाठी वैद्यकीय दाखला सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
भोईटे शाळेमध्ये वैद्यकीय पथकाची केली नियुक्ती -
मनपाने एम. जे. महाविद्यालयाजवळील भोईटे शाळेत वैद्यकीय पथक नियुक्त केले आहे. त्याठिकाणी जिल्ह्यातून बाहेर जाण्यासाठी आवश्यक असणारी वैद्यकीय तपासणी सुरू केली आहे. नोंदणी केलेल्या नागरिकांचा ताप, शरिरातील आक्सिजनचे प्रमाण, रक्तदाब परीक्षण करण्यात येत आहे. आधार कार्ड दाखवल्यानंतर संबंधितांची तपासणी करून वैद्यकीय दाखला दिला जात आहे. दोन दिवसात शहरातील २९० जणांनी तपासणी करून दाखले घेतले आहेत. आरोग्याधिकारी डॉ. विकास पाटील यांच्या मार्गदर्शनात डॉ. दीपश्री पाटील आणि डॉ. अनुजा पाटील नागरिकांची तपासणी करत आहेत.