जळगाव -जिल्हा बँकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी अर्जांचा पाऊस पडला. एकूण २१ जागांसाठी २७९ अर्ज दाखल झाले. या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप आमने-सामने असल्याने अनेक दिग्गजांनी एकमेकांविरोधात अर्ज दाखल केले असून, तगड्या लढती रंगणार आहेत.
भाजप बॅक फूटवर -
स्वबळाचा नारा दिल्यानंतर भाजप या निवडणुकीत बॅकफूटवर आल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपकडून सर्व २१ जागांवर लढण्याचा दावा केला जात होता. मात्र, भाजपला ४ जागांवर उमेदवार देता आलेले नाहीत. पारोळा, एरंडोल, धरणगाव आणि बोदवडला भाजपने उमेदवार दिलेला नाही. भाजपकडून सोमवारी माजीमंत्री गिरीश महाजन, खासदार रक्षा खडसे, उन्मेष पाटील, आमदार सुरेश भोळे, संजय सावकारे, मंगेश चव्हाण, माजी आमदार स्मिता वाघ, माजी खासदार ए. टी. पाटील, पारोळ्याचे नगराध्यक्ष करण पाटील या दिग्गजांनी अर्ज दाखल केले.
खडसे नणंद-भावजयी आमने-सामने?
खासदार रक्षा खडसे यांनीदेखील भाजपकडून ओबीसी मतदारसंघ व महिला राखीव मतदारसंघामधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या ऍड. रोहिणी खडसे यांनीही महिला राखीव आणि विकास सोसायटी मतदारसंघातून अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे खडसे परिवारातील नणंद-भावजयी आमने-सामने येण्याची शक्यता आहे. महिला राखीवमधून दोघांनी आपले अर्ज मागे घेतले नाही तर ही लढत रंगणार आहे. मात्र, रोहिणी खडसे यांनी महिला प्रवर्गातून माघार घेतली व मुक्ताईनगर सोसायटी मतदारसंघातील अर्ज कायम ठेवला तर ही लढत टाळली जाईल. राष्ट्रवादीची कोंडी करण्यासाठी भाजप याठिकाणी रक्षा खडसेंना रिंगणात उतरवू शकतो.