जळगाव- जिल्ह्यातील रावेर शहरातील रहिवासी असलेल्या 22 वर्षीय महिलेने तिळ्यांना जन्म दिल्याची घटना सोमवारी (2 ऑगस्ट) रोजी दुपारी दीड वाजता घडली आहे. अमरीन बी शेख मुस्तकीन असे प्रसूत झालेल्या महिलेचे नाव असून, ती रावेर शहरातील मन्यारवाडा भागातील रहिवासी आहे. या मातेसह तीनही मुलांची प्रकृती ठणठणीत आहे.
नॉर्मल झाली प्रसूती-
अमरीन बी शेख मुस्तकीन या महिलेला प्रसूतीसाठी रावेर शहरातील माऊली हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. सोमवारी त्यांनी तिळ्यांना जन्म दिला. डॉक्टरांच्या प्रयत्नाने नॉर्मल प्रसूती करण्यात आली असून, तीनही मुलांसह मातेची तब्येत चांगली आहे.
डॉक्टरांसाठी होते आव्हान-
अमरीन बी शेख मुस्तकीन यांना प्रसूती वेदना जाणवू लागल्याने माऊली हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती बघता नॉर्मल प्रसूती होण्याची चिन्ह दिसत नव्हते. मात्र, डॉ. संदीप पाटील यांनी त्यांच्या वैद्यकीय ज्ञानासह अनुभवाच्या आधारे उपचार करून अमरीन यांची नॉर्मल प्रसूती केली. सोमवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास तिळ्यांना अमरीनने जन्म दिला. जन्मलेली तिन्ही मुले असून त्यांची प्रकृती चांगली आहे. अमरीन यांनी तिळ्यांना जन्म दिल्याचे माहिती होताच त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती.