जळगाव- कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात परदेशातून परतलेल्या तिघा तरुणांसह ४ नवीन संशयित रुग्ण दाखल झाले आहेत. दरम्यान, गुरुवारी दाखल झालेल्या ४ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. काल दाखल झालेले ३ व आजचे नवीन ४ रुग्ण असे ७ जण कोरोना कक्षात दाखल आहेत. या ७ जणांचे नमूने पाठविण्यात आले असून त्यांच्या अहवालांची प्रतीक्षा असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांनी दिली.
जिल्ह्यात परदेशातून परतलेल्या तसेच कोरोना पॉझेटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आल्याच्या संशयातून आतापर्यंत २० संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. त्यातील ११ संशयितांचे अहवाल निगेटिव्ह म्हणून प्राप्त झाले आहेत. तर, २ जणांचे नमूने ते परदेशातून आलेले नसल्याने तसेच कोरोना पॉझेटिव्ह रुग्णांच्या संपर्कात नसल्याने तपासणीसाठी नाकारण्यात आले आहेत. काल आणि आज दाखल झालेल्या ७ जणांचे अहवाल अद्याप प्राप्त झालेले नाहीत. भुसावळ येथील अत्यवस्थ अवस्थेत दाखल झालेल्या डॉक्टरांना काल मध्यरात्रीच मुंबईत हलविण्यात आले होते. त्यांचा कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यांना आतड्याचा गंभीर आजार असल्याचे निष्पन्न झाले आहे.