जळगाव -वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या 2 तरुणांचा धबधब्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना 5 सप्टेंबर रोजी सायंकाळी महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशाच्या सीमेवर असलेल्या सातपुडा पर्वतरांगेतील बसाली वॉटरफॉल या पर्यटनस्थळी घडली. या घटनेत मृत्यू पावलेले दोन्ही तरुण हे जळगावातील रहिवासी होते. दोघांचे मृतदेह सोमवारी दुपारी पाण्यातून बाहेर काढण्यात आले.
जळगावातील 2 तरुणांचा धबधब्याच्या पाण्यात बुडून मृत्यू; वाढदिवस साजरा करण्यासाठी गेले होते सातपुडा पर्वतरांगांवर - Jalgaon News
वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या 2 तरुणांचा धबधब्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना 5 सप्टेंबर रोजी सायंकाळी महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशाच्या सीमेवर असलेल्या सातपुडा पर्वतरांगेतील बसाली वॉटरफॉल या पर्यटनस्थळी घडली. या घटनेत मृत्यू पावलेले दोन्ही तरुण हे जळगावातील रहिवासी होते. दोघांचे मृतदेह सोमवारी दुपारी पाण्यातून बाहेर काढण्यात आले.
उज्ज्वल राजेंद्र पाटील (वय 24, रा. खेडी, ता. जळगाव) आणि जयेश रवींद्र माळी (वय 25, रा. वाघनगर, जळगाव) अशी या घटनेतील मृतांची नावे आहेत. या घटनेत मरण पावलेल्या उज्ज्वल पाटील या तरुणाचा काल, 5 सप्टेंबर रोजी वाढदिवस होता. मात्र, दुर्दैवाने वाढदिवशीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे जळगाव शहरावर एकच शोककळा पसरली आहे.
नेमकं काय घडलं?
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, खेडी येथील रहिवासी असलेला उज्ज्वल पाटील याचे 'एमबीए'चे शिक्षण झालेले होते. तो एका मार्केटिंग कंपनीत कामाला होता. काल त्याचा वाढदिवस होता. वाढदिवस साजरा करण्यासह वर्षाविहारासाठी तो आपल्या मित्रांसोबत, जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील पाल गावापासून काही अंतरावर असलेल्या सातपुडा पर्वतरांगांमध्ये गेलेला होता. बसाली वॉटरफॉल याठिकाणी सर्व मित्र एकत्र जमले होते. हे ठिकाण महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशाच्या सीमेवर असून, ते मध्यप्रदेशात मोडते. सायंकाळी उज्ज्वल हा काही मित्रांसोबत धबधब्याच्या पाण्यात पोहण्यासाठी उतरला. तेव्हा पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो स्वतः आणि त्याचा मित्र जयेश माळी हे दोघे जण पाण्यात बुडाले. या प्रकारानंतर सोबत असलेले इतर मित्र घाबरले. त्यांनी दोघांचा पाण्यात शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण अंधारामुळे त्यांना यश आले नाही.
दुसऱ्या दिवशी सापडले दोघांचे मृतदेह-
ही घटना घडल्यानंतर सोमवारी सकाळी मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पट्टीच्या पोहणाऱ्यांनी मृत उज्ज्वल व जयेश यांचे मृतदेह धबधब्याच्या पाण्यातून बाहेर काढले. त्यानंतर पंचनामा करून ते उत्तरीय तपासणीसाठी बऱ्हाणपूर सिव्हील हॉस्पिटलमध्ये रवाना करण्यात आले.
नातेवाईकांचा मन हेलवणारा आक्रोश-
दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मृत तरुणांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली होती. त्यांनी मन हेलवणारा आक्रोश केला. या प्रकरणी बऱ्हाणपूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. मृत उज्ज्वल व जयेश यांच्या पश्चात आई-वडील, लहान भाऊ असा परिवार आहे.