जळगाव - रुग्णालयातील डॉक्टर्स आणि नर्सिंग स्टाफच्या हलगर्जीपणामुळे दोन मृतदेहांची अदलाबदल झाल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. ही घटना जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील साकेगावजवळ असलेले गोदावरी मेडिकल फाउंडेशनचे डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात घडली आहे. हे वैद्यकीय महाविद्यालय कोरोनासाठी अधिग्रहित केलेले आहे. याच रुग्णालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आणणारी धक्कादायक घटना शुक्रवारी समोर आली आहे.
रुग्णालयातून ताब्यात घेतलेल्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यापूर्वी दफनभूमीत नातेवाईकांनी मृतदेहाची पाहणी केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार निदर्शनास आला. भुसावळ शहरातील खडका रोडवरील मुस्लिम कॉलनीत राहणाऱ्या फातिमाबी अब्दुल समद पिंजारी (वय 65) यांचा मृतदेह बदलण्याची घटना समोर आली आहे. तीन दिवसांपूर्वी फातिमाबी पिंजारी यांना सर्दी, ताप आणि उच्च रक्तदाबाचा त्रास जाणवत होता. त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांना भुसावळ शहरातील रेल्वे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने रेल्वे रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी फातिमाबी यांना डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात हलवण्यास सांगितले. त्यानुसार, नातेवाईकांनी फातिमाबी यांना डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात दाखल केले होते. त्या ठिकाणी सुरुवातीला त्यांची कोरोनासाठी अँटीजन चाचणी करण्यात आली. ती निगेटिव्ह आल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, गुरुवारी रात्री त्यांची प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांचा मृत्यू झाला. रात्रीची वेळ असल्याने रुग्णालय प्रशासनाने फातिमाबी यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला नाही.
फातिमाबी यांचे नातेवाईक आज सकाळी मृतदेह घेण्यासाठी रुग्णालयात आले. तेव्हा रुग्णालयाने प्लास्टिकच्या बॅगमध्ये गुंडाळलेला मृतदेह ताब्यात देऊन दफनभूमीत नेऊन अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना नातेवाईकांना दिल्या. त्यानुसार, फातिमाबी यांचे नातेवाईक मृतदेह घेऊन भुसावळला गेले. त्यानंतर दफनभूमीत मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यापूर्वी फातिमाबी यांच्या मुलींनी अखेरचे दर्शन घेण्यासाठी बॅग उघडून पाहिली. तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. तो मृतदेह फातिमाबी यांचा नव्हता. या प्रकारानंतर नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त केला. दरम्यान, या प्रकारासंदर्भात रुग्णालय प्रशासनाशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.