जळगाव - आषाढी एकादशीला विठुरायाच्या दर्शनाला जाणाऱ्या कुटुंबावर काळाने झडप घातली. जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात असलेल्या काकणबर्डी गावाजवळ ही दुर्दैवी घटना घडली. एसटी बस आणि कार यांच्यात झालेल्या अपघातात कारमधील दोन जण जागीच ठार झाले, बस आणि कारमधील १५ ते १६ जण जखमी झाले आहेत.
विठूरायाच्या दर्शनाला जाणाऱ्या कुटुंबावर काळाची झडप; एसटी-कारच्या अपघातात २ ठार, १६ जखमी - विठुराया
बापू मराठे हे त्यांच्या कुटुंबासह नातेवाईकांना सोबत घेऊन एरंडोलहून पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव येथे आषाढी एकादशीनिमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी कारने जात होते. पाचोरा तालुक्यातील काकणबर्डी ते ओझर रस्त्यावर त्यांच्या कारला समोरून भरधाव येणाऱ्या बसने जोरदार धडक दिली.
![विठूरायाच्या दर्शनाला जाणाऱ्या कुटुंबावर काळाची झडप; एसटी-कारच्या अपघातात २ ठार, १६ जखमी](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3818893-thumbnail-3x2-jal.jpg)
बापू रघुनाथ मराठे (वय 48) आणि परी मराठे (वय 8) असे अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. बापू मराठे हे त्यांच्या कुटुंबासह नातेवाईकांना सोबत घेऊन एरंडोलहून पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव येथे आषाढी एकादशीनिमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी कारने जात होते. पाचोरा तालुक्यातील काकणबर्डी ते ओझर रस्त्यावर त्यांच्या कारला समोरून भरधाव येणाऱ्या बसने जोरदार धडक दिली. या अपघातात कारचालक बापू मराठे आणि त्यांच्या साडूची मुलगी परी हे जागीच ठार झाले आहेत. तर कारमधील सरला बापू मराठे (वय 36), गौरव बापू मराठे (वय 18), मयुरी पाटील (वय 16), रेखा पाटील (वय 36), ओम पाटील (वय 5वर्ष ) हे जखमी झाले आहेत.
अपघातानंतर बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात गेली. त्यामुळे बसमधील 8 ते 10 प्रवाशी देखील जखमी झाले आहेत.
दरम्यान, या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच काकणबर्डी तसेच ओझर गावातील लोकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. अपघातातील जखमींना तत्काळ पाचोरा येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पाचोरा पोलिसांनी घटनास्थळी येऊन प्राथमिक पंचनामा केला. पोलीस पुढील तपास करीत आहेत.