जळगाव -जिल्ह्यातील जामनेर शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. बारावीत शिकणाऱ्या एका 19 वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना आज (रविवारी) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास जामनेरातील दत्त मंदिर परिसरात असलेल्या जहागीरदार वाडा येथे घडली. नम्रता पद्माकर खोडके असे आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव आहे. दरम्यान तिच्या मृतदेहाजवळ मोबाइलमध्ये पब्जी गेम सुरु असल्याचे आढळून आले आहे. यावरुन तिने पब्जीच्या नादात आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
आत्महत्या करण्यापूर्वी लिहिली सुसाइड नोट-
नम्रता हिने आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाइड नोट लिहिली आहे. त्यात तिने 'मी माझ्या मर्जीने आत्महत्या करत असून, यात माझ्या घरच्यांचा किंवा कोणाचाही दोष नाही', असा उल्लेख केला आहे. ही सुसाइड नोट पोलिसांनी तपासकामी जप्त केली आहे.
हातावर केलेत वार-
नम्रता हिचे वडील पद्माकर खोडके हे पेशाने डॉक्टर असून ते एका स्थानिक डॉक्टरकडे सहायक डॉक्टर म्हणून काम पाहतात. रविवारी सायंकाळी घरात कुणीही नसताना नम्रता हिने छताच्या पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्या हातांवर वार केल्याने जखमा झाल्या आहेत. ही घटना समोर आल्यानंतर जामनेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना घटनास्थळी सुसाईड नोट मिळाली आहे.
मोबाइलमध्ये पब्जी गेमचे अप्लिकेशन दिसले -
मिळालेल्या माहितीनुसार नम्रता ही सतत मोबाइल पाहत असायची. तिच्या आत्महत्येची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तिचा मोबाइल ताब्यात घेतला. तेव्हा मोबाइलमध्ये पब्जी गेमचे अप्लिकेशन सुरू असल्याचे दिसून आले, असे सांगितले जात आहे. यावरुन तिने पब्जीच्या नादात आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. जामनेर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा घटनेची नोंद करण्यात आली आहे.
हेही वाचा -पुष्पक एक्स्प्रेस घटना : अत्याचार अन् दरोडा प्रकरणी आठ जण अटकेत