जळगाव - रेल्वेच्या प्रशिक्षणासाठी तामिळनाडू राज्यातील कोईम्बतूर येथे गेलेले जळगाव जिल्ह्यातील 170 विद्यार्थी लॉकडाऊनमुळे तिकडेच अडकून पडले होते. या विद्यार्थ्यांना राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नांनी मंगळवारी सुखरूप जळगावात परत आणण्यात आले. राज्य परिवहन महामंडळाच्या 6 बसेसने हे विद्यार्थी आपल्या घरी परत आले.
जळगाव जिल्ह्यातील 170 विद्यार्थ्यांसह राज्यभरातील सुमारे 600 विद्यार्थी वर्षभरापूर्वी रेल्वेच्या प्रशिक्षणासाठी तामिळनाडू राज्यातील कोईम्बतूर येथे गेले होते. प्रशिक्षण कालावधी पूर्ण झाल्यानंतर ते घरी परतणार होते. मात्र, त्याचवेळी देशभरात कोरोनाच्या नियंत्रणासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यामुळे या विद्यार्थ्यांना घरी परतणे शक्य झाले नाही. रेल्वेचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यामुळे त्यांना राहण्याची आणि खाण्याची समस्या निर्माण झाली होती. लॉकडाऊनचा पहिला टप्पा कसा तरी पूर्ण केल्यानंतर ते सातत्याने कुटुंबीयांशी संपर्क साधून सुटकेची मागणी करत होते. परंतु, लॉकडाऊन पुन्हा वाढल्याने कुटुंबीय देखील काही करू शकत नव्हते. ही बाब पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांच्या कानावर घातल्यानंतर त्यांनी पुढाकार घेतला.
कोरोनाबाबत आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवेळी गुलाबराव पाटील यांनी जळगावसह राज्यभरातील सुमारे 600 विद्यार्थी हे रेल्वेच्या प्रशिक्षणासाठी गेलेले तामिळनाडू राज्यातील कोईम्बतूर येथे अडकून पडल्याची बाब निदर्शनास आणून दिली होती. या विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न करण्याची विनंती गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे केली होती. त्यानुसार, राज्य सरकारने तातडीने पावले उचलून तामिळनाडूत अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांसाठी बसेस सोडण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर महाराष्ट्र राज्य सरकारने तामिळनाडू सरकारशी चर्चा केली. त्यांची मंजुरी मिळाल्यानंतर महाराष्ट्रातून सुरुवातीला सांगली येथून कोईम्बतूर, सेलमसाठी बसेस सोडण्यात आल्या. या बसेस विद्यार्थ्यांना घेऊन महाराष्ट्रात दाखल झाल्या. सांगली, मिरज येथून पुन्हा जळगाव जिल्ह्यातील 6 बसेसने हे सर्व विद्यार्थी आज जळगावात परतले.