महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

५ वर्षात १६ हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या, मग मनुष्यवधाचा गुन्हा कुणावर दाखल करावा?- अमोल कोल्हे

महाराष्ट्रात गेल्या ५ वर्षात १६ हजार शेतकरी आत्महत्या करतात. १६ हजार कुटुंब उघड्यावर येतात. १६ हजार माता-भगिणींच्या कपाळावरील कुंकू पुसले जाते, मग आता आमचा फडणवीस सरकारला प्रश्न आहे की, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कुणावर दाखल करावा? अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हेंनी भाजपवर घणाघाती टीका केली.

अमोल कोल्हे

By

Published : Oct 17, 2019, 6:21 PM IST

जळगाव- महाराष्ट्रात गेल्या ५ वर्षात १६ हजार शेतकरी आत्महत्या करतात. १६ हजार कुटुंब उघड्यावर येतात. १६ हजार माता-भगिणींच्या कपाळावरील कुंकू पुसले जाते, मग आता आमचा फडणवीस सरकारला प्रश्न आहे की, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कुणावर दाखल करावा? अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी भाजपवर घणाघाती टीका केली.

सभेला संबोधित करताना राष्ट्रवादीचे काँग्रेस खासदार अमोल कोल्हे

चंद्रकांत पाटील हे मुक्ताईनगर विधानसभा निवडणुकीतील महाआघाडीचे पुरस्कृत उमेदवार आहेत. त्यांच्या प्रचारार्थ गुरुवारी जळगाव जिल्ह्यातील बोदवड शहरात अमोल कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत सभा पार पडली. या सभेत बोलतांना कोल्हे यांनी सदर प्रतिक्रिया दिली. ते पुढे म्हणाले की, २०१४ च्या निवडणुकीपूर्वी भाजपचे नेते महाराष्ट्रात यात्रा काढून, आम्ही कापसाला अमुक भाव देऊ, सोयाबीनला तमुक भाव देऊ, असे सांगत होते. पण शेतीमालाच्या हमीभावाचे काय झाले? तेव्हाही भाजपचे नेते सांगत होते, आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, आताही हेच सांगत आहेत. तेव्हा ते म्हणत होते कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा, आता आम्हाला प्रश्न पडतो आहे त्यांनी कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा, असा टोला अमोल कोल्हे यांनी भाजपला लगावला. कलम ३७०, महाराष्ट्र राज्य शिखर बँकेतील गैरव्यवहार, अशा मुद्यांवरून त्यांनी भाजपला लक्ष्य केले.

हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान नाही का?

२०१४ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन भाजप आणि सेनेचे सरकार सत्तेत आले. मात्र, त्यांनी वेळोवेळी शिवरायांचा अपमान करण्याचे पाप केले आहे. गुजरातमध्ये 3 हजार कोटी रुपये खर्चून सरदार वल्लभभाई पटेलांचा 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' पुतळा उभा राहतो. पण महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या अरबी समुद्रातील स्मारकाची एक वीटही रचली जात नाही. इंदू मिलमधील बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक उभे राहत नाही. एवढेच काय तर हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक होत नाही, हे दुर्दैव आहे.

महाराष्ट्राचा स्वाभिमान दडपण्याचे, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला डिवचण्याचे कारस्थान भाजपकडून होत आहे, अशी जळजळीत टीकाही अमोल कोल्हे यांनी केली. अरबी समुद्रात प्रस्तावित असलेल्या शिवरायांच्या स्मारकाच्या कामात कोट्यवधींचा अपहार होतो, हा शिवरायांचा अपमान नाही का? कर्जमाफीसारख्या फसव्या योजनेला शिवरायांचे नाव देणे, हा शिवरायांचा अपमान नाही का? ३ सप्टेंबरच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत भाजप सरकारने महाराष्ट्रातील गडकिल्ले हॉटेल आणि लग्न समारंभासाठी भाड्याने देण्याचा निर्णय घेतला, हा देखील महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान आहे. त्यामुळे असे पाप करणाऱ्या भाजपच्या कमळाला या निवडणुकीत एकही पाकळी राहता कामा नये, असे आवाहन देखील अमोल कोल्हे यांनी उपस्थितांना केले.

शिवरायांचा इतिहास हद्दपार करण्याचे पाप भाजपने केले

इयत्ता चौथीच्या पाठ्यपुस्तकातून महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हद्दपार करण्याचे पाप भाजप सरकारने केले आहे. हे पाप करणाऱ्या भाजप सरकारला या निवडणुकीत महाराष्ट्रातूनच हद्दपार करा, असे आवाहन देखील अमोल कोल्हे यांनी केले. इयत्ता चौथीच्या पाठ्यपुस्तकातूनच आपल्याला शिवरायांच्या कार्याची ओळख झाली आहे. ज्या चौथीच्या पुस्तकातून आजच्या तरुण पिढीला महाराजांची ओळख होत होती, तो महाराजांचा इतिहास हद्दपार करण्याचे पाप भाजपने केले आहे, अशी टीकाही यावेळी कोल्हेंनी केली. ज्या पक्षात तुम्हाला जागा नाही, तेथे तुमच्या वारसांना काय जागा मिळेल? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.

हेही वाचा-देशाला जाती-धर्माच्या नावाखाली तोडणाऱ्या मानसिकतेविरुद्ध भाजपचा संघर्ष- स्मृती इराणी

आपल्या भाषणात अमोल कोल्हेंनी भाजपचे नेते तथा माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यावर देखील टीका केली. ज्या पक्षात तुम्हालाच जागा शिल्लक राहिली नाही, तेथे तुमच्या वारसांना काय जागा मिळेल? अशा शब्दांत त्यांनी खडसेंचा समाचार घेतला. एकनाथ खडसे यांनी आजवर घराणेशाहीचे राजकारण केले आहे. मात्र, आता जनता त्यांच्या पाठीशी उभी राहणार नाही, असेही ते सभे दरम्यान म्हणाले.

हेही वाचा-एकनाथ खडसेंना व्हायचंय पंतप्रधान!

ABOUT THE AUTHOR

...view details