महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धक्कादायक! जळगाव जिल्ह्यात 11 महिन्यात दीडशेहून अधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या

गेल्या 11 महिन्यांच्या काळात जळगाव जिल्ह्यातील तब्बल दीडशेहून अधिक शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे. जानेवारी ते नोव्हेंबर 2019 या कालावधीत जिल्ह्यातील विविध तालुक्यातील दीडशेहून अधिक शेतकऱ्यांनी दुष्काळ, नापिकी अशा कारणांमुळे आत्महत्या केल्या आहेत.

जळगाव जिल्ह्यात 11 महिन्यात दिडशेहून अधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या
जळगाव जिल्ह्यात 11 महिन्यात दिडशेहून अधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By

Published : Dec 5, 2019, 10:01 AM IST

जळगाव- गेल्या 4 वर्षांपासून सततचा दुष्काळ, त्यानंतर यावर्षी झालेली अतिवृष्टी अशा नैसर्गिक संकटांची मालिका थांबत नाहीये. अशा परिस्थितीत जळगाव जिल्ह्यातील बळीराजा अक्षरशः हतबल झाल्याचे पाहायला मिळत आहे. निसर्गाच्या प्रकोपामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात असताना शासनस्तरावरुनही दिलासा मिळत नसल्याने प्रपंचाचा गाडा हाकायचा कसा? डोक्यावरचे कर्ज फेडायचे कसे ? मुला-मुलींची लग्ने कशी करायची? अशा प्रश्नांची उत्तरे शोधण्यात अपयशी ठरलेले शेतकरी थेट टोकाचा निर्णय घेत आहेत.

गेल्या 11 महिन्यांच्या काळात जळगाव जिल्ह्यातील तब्बल दीडशेहून अधिक शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे. जानेवारी ते नोव्हेंबर 2019 या कालावधीत जिल्ह्यातील विविध तालुक्यातील दीडशेहून अधिक शेतकऱ्यांनी दुष्काळ, नापिकी अशा कारणांमुळे आत्महत्या केल्या आहेत. जिल्ह्यात गेल्या 4 ते 5 वर्षांपासून सातत्याने कोरडा दुष्काळ होता. यावर्षी पावसाळा ऋतूच्या सुरुवातीपासून चांगला पाऊस झाला. त्यामुळे हंगाम चांगला येईल, अशा अपेक्षेत शेतकरी होते. मात्र, सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात पावसाने उघडीप दिली नाही. त्यामुळे उडीद, मूग, भुईमूग ही कडधान्य पिके हातून गेली. त्यानंतर शेतकऱ्यांची मदार कापूस, मका, ज्वारी, बाजरी या नगदी पिकांवर होती. मात्र, ऑक्टोबर महिन्यात सुरू झालेला परतीचा पाऊस नोव्हेंबरपर्यंत लांबला.

जळगाव जिल्ह्यात 11 महिन्यात दीडशेहून अधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या

अतिवृष्टीमुळे संपूर्ण खरीप हंगाम वाया गेला. यावर्षी जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत जास्त पाऊस झाल्याने दुष्काळ हद्दपार झाला खरा; परंतु, ओल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. हाती उत्पन्न न आल्याने डोक्यावरचे कर्ज कसे फेडायचे, या विवंचनेत अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलले. गेल्या वर्षभराच्या काळात सर्वाधिक आत्महत्या या एप्रिल ते सप्टेंबर महिन्यात झाल्या आहेत. नव्या वर्षाच्या सुरुवातीला दुष्काळामुळे सुरू झालेले शेतकरी आत्महत्यांचे सत्र पुढे जाऊन अतिवृष्टीमुळे शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीमुळे वाढतच राहिले.

ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक पाऊस झाल्यामुळे पिकांचे नुकसान झाले. याच काळात अधिक शेतकरी आत्महत्या झाल्या. यावर्षी सर्वाधिक 22 शेतकरी आत्महत्या सप्टेंबर महिन्यात झाल्या आहेत. त्याआधी ऑगस्ट महिन्यातही तब्बल 19 शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवल्याची नोंद प्रशासकीय दप्तरी आहे. जून आणि मे महिन्यातदेखील अनुक्रमे 18 आणि 17 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. खरीप हंगामात प्रचंड नुकसान झाल्याने आता समोर पर्याय उरलेला नसल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र सुरूच आहे.

कर्जमाफी, आर्थिक मदत दिवास्वप्नच-

शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीपोटी आर्थिक मदत मिळेल, या आशेवर बसलेल्या शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच येत आहे. फडणवीस सरकारच्या काळात जाहीर झालेल्या कर्जमाफीचा लाभ अद्यापही हजारो शेतकऱ्यांना मिळालेला नाही. त्यानंतर यावर्षी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून केंद्र सरकारकडून मदतीचा पहिला टप्पा जाहीर झाला आहे. मात्र, अजूनही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दमडीही आलेली नाही. अशा रितीने फरपट सुरू असल्याने शेतकऱ्यांचा धीर सुटत चालला आहे. आता राज्याच्या सत्तेवर आलेले महाविकास आघाडीचे 'ठाकरे सरकार' शेतकऱ्यांचा सातबारा सरसकट कोरा करून दिलासा देते का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

आत्महत्याग्रस्त कुटुंबांची फरपटच-

एकीकडे शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरू असताना दुसरीकडे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबांची फरपट सुरूच आहे. शेतकरी आत्महत्या झाल्यानंतर शासनाकडून कुटुंबाला आर्थिक मदत मिळते. मात्र, जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येची अनेक प्रकरणे लालफितीत अडकली आहेत. आत्महत्येच्या घटनेनंतर झालेल्या पोलीस पंचनाम्यातील त्रुटी, शवविच्छेदन अहवालातील त्रुटी, कागदपत्रांची अपूर्णता अशा कारणांमुळे अनेक प्रकरणे मदतीच्या निकषातून बाद होतात. जळगाव जिल्ह्यात जानेवारी ते नोव्हेंबर 2019 दरम्यान दीडशेहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यापैकी केवळ 54 प्रकरणे शासकीय मदतीसाठी पात्र आहेत. 32 प्रकरणे अपात्र झाली असून 55 ते 60 प्रकरणे कोणत्याही निर्णयाविना प्रलंबित आहेत.

शेतकरी आत्महत्यांची महिनानिहाय आकडेवारी -

1) जानेवारी- एकूण 10 आत्महत्या, पात्र प्रकरणे 8, अपात्र प्रकरणे 2

2) फेब्रुवारी- एकूण 12 आत्महत्या, पात्र प्रकरणे 9, अपात्र प्रकरणे 3

3) मार्च- एकूण 11 आत्महत्या, पात्र प्रकरणे 6, अपात्र प्रकरणे 3, प्रलंबित प्रकरणे 2

4) एप्रिल- एकूण 13 आत्महत्या, पात्र प्रकरणे 4, अपात्र प्रकरणे 9

5) मे- एकूण 17 आत्महत्या, पात्र प्रकरणे 7, अपात्र प्रकरणे 9, प्रलंबित प्रकरणे 1

6) जून- एकूण 18 आत्महत्या, पात्र प्रकरणे 11, अपात्र प्रकरणे 3, प्रलंबित प्रकरणे 4

7) जुलै- एकूण 13 आत्महत्या, पात्र प्रकरणे 6, अपात्र प्रकरणे 1, प्रलंबित प्रकरणे 6

8) ऑगस्ट- एकूण 19 आत्महत्या, पात्र प्रकरणे 3, अपात्र प्रकरणे 2, प्रलंबित प्रकरणे 14

9) सप्टेंबर- एकूण 22 आत्महत्या, प्रलंबित प्रकरणे 22

10) ऑक्टोबर- एकूण 6 आत्महत्या, प्रलंबित प्रकरणे 6

ABOUT THE AUTHOR

...view details