जळगाव - जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग आता वेगाने वाढू लागला आहे. जिल्ह्यातील अमळनेरात आणखी 14 कोरोनाबाधित रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील बाधितांची संख्या 114 झाली आहे. कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या अमळनेरात झपाट्याने रूग्ण संख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण पडतो आहे.
अमळनेर येथे स्वॅब घेतलेल्या 78 कोरोना संशयित व्यक्तींचे नमुने तपासणी अहवाल शुक्रवारी सकाळी जिल्हा रुग्णालय प्रशासनाला मिळाले. यापैकी 64 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून 14 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. पॉझिटिव्ह आढळलेले सर्व रुग्ण हे अमळनेर शहरातील आहेत. जिल्ह्यात आत्तापर्यंत कोरोना बाधित रुणांची संख्या 114 इतकी झाली असून त्यापैकी 16 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 2 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.