महाराष्ट्र

maharashtra

By

Published : May 13, 2021, 11:38 AM IST

ETV Bharat / state

जळगाव जिल्ह्यात हातपाय पसरतोय 'म्युकर मायकोसिस'; आतापर्यंत 13 जणांना लागण, 6 जणांचा बळी

जळगाव जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर म्युकर मायकोसिस आजाराचे रुग्ण समोर येऊ लागले आहेत. सद्यस्थितीत 13 रुग्णांना लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्यापैकी 6 जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये 3 महिला रुग्ण होत्या. सद्यस्थितीत 7 रुग्णांवर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार केले जात आहेत.

mucormycosis news, anita bhole, mucormycosis symptoms
म्युकर मायकोसिस

जळगाव -जिल्ह्यात कोरोना पाठोपाठ आता म्युकर मायकोसिस नावाचा बुरशीजन्य आजार हातपाय पसरत आहे. हा आजार दुर्मिळ आणि जुनाच आजार आहे. मात्र, कोरोनामुळे रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होत असल्याने त्याने डोके वर काढले आहे. कोरोनाच्या उपचारात वापरल्या जाणाऱ्या स्टिरॉइड्समुळे हा आजार बळावत असल्याचे वैद्यकीय तज्ञांचे म्हणणे आहे. कोरोनाची दुसरी लाट धडकल्यानंतर जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत 13 रुग्णांना या आजाराची लागण झाली आहे. त्यात 6 जणांचा बळी गेला आहे.

म्युकर मायकोसिस आजाराबाबत माहिती देताना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी सांगितले की, जळगाव जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर या आजाराचे रुग्ण समोर येऊ लागले आहेत. सद्यस्थितीत 13 रुग्णांना लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्यापैकी 6 जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये 3 महिला रुग्ण होत्या. सद्यस्थितीत 7 रुग्णांवर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार केले जात आहेत. समोर आलेल्या रुग्णांमध्ये 9 जणांना मधुमेह आजार होता, असेही डॉ. चव्हाण यांनी सांगितले.

नेमका काय आहे म्युकर मायकोसिस?

म्युकर मायकोसिस आजाराबद्दल अधिक माहिती देताना 'ईटीव्ही भारत'शी बोलताना जळगावातील नाक-कान-घसा तज्ञ डॉ. अनिता भोळे यांनी सांगितले की, म्युकर मायकोसिस हा बुरशीजन्य आजार आहे. हा आजार जुनाच आहे. परंतु, आता कोरोनामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होत असल्याने तो बळावत आहे. कोरोनाच्या उपचारात रुग्णांना लागणाऱ्या स्टिरॉइड्स औषधांमुळे हा आजार बळावत असल्याचे दिसून येत आहे. या आजाराची प्रमुख लक्षणे अशी की, चेहऱ्याच्या एका भागाला अचानक सूज येणे, गाल सुजणे, डोळा सुजून बाहेर येणे, तोंडात किंवा नाकात फंगल इन्फेक्शन होणे, दात अचानक हलू लागणे अशी या आजाराची लक्षणे आहेत. विशेष करून मधुमेह असलेल्या रुग्णांना हा आजार होण्याची शक्यता अधिक असते. मधुमेह असलेल्यांना कोरोना झाला असेल आणि त्यांच्या शरीरातील साखरेचे प्रमाण वाढले असेल तर हा म्युकर मायकोसिस वेगाने वाढत जातो, असे डॉ. भोळे म्हणाल्या.

माहिती देताना डॉ. अनित भोळे..

वेळीच उपचार झाले तर ठीक अन्यथा आजार जीवघेणा-

म्युकर मायकोसिस आजाराची लक्षणे जाणवताच रुग्णाने वेळीच उपचार घेणे गरजेचे आहे. अन्यथा जीव जाऊ शकतो. ज्या अवयवाला संसर्ग झाला आहे, तो प्रसंगी शस्त्रक्रिया करून काढून टाकावा लागतो. रुग्णाने वेळीच उपचार घेतले तर हा आजार दोन किंवा तीन आठवड्यात बरा होऊ शकतो. कधी कधी सहा महिने देखील उपचार सुरू ठेवावे लागतात. या आजाराची रुग्णांना 'अँम्फोटेरेसीन बी' इंजेक्शन द्यावे लागते, असे डॉ. अनिता भोळेंनी सांगितले.

औषधांचा तुटवडा, किंमती वाढल्या-

म्युकर मायकोसिसच्या बाबतीत जळगाव जिल्ह्यातील परिस्थिती सद्यस्थितीत नियंत्रणात असली तरी भविष्यात ती वाढू शकते, असा अंदाज आहे. राज्यभर म्युकर मायकोसिसचे रुग्ण आढळून येत असल्याने औषधांचा तुटवडा जाणवू लागला आहे. जळगाव जिल्ह्यात देखील हीच परिस्थिती आहे. मात्र, रुग्णसंख्या कमी असल्याने सध्या मागणीही कमीच आहे. या आजाराच्या उपचारासाठी लागणाऱ्या अँम्फोटेरेसीन बी इंजेक्शनची किंमत साधारणपणे 5 ते 6 हजार आहे. मात्र, ती वाढीव दराने विकली जात आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details