महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत राजकीय भूकंप होणार? १३ संचालक राजीनामे देण्याच्या तयारीत

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमधील संचालक आणि सभापती यांच्यामध्ये वाद पेटला आहे. त्यामुळे १३ संचालक राजीनामे देण्याच्या तयारीत आहेत. येत्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नवीन समीकरणे तयार होण्याची शक्यता आहे.

By

Published : Feb 12, 2021, 10:31 AM IST

Jalgaon Agricultural Produce Market Committee
जळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती

जळगाव - कृषी उत्पन्न बाजार समितीत राजकीय भूकंप होण्याची चिन्हे दिसत आहेत. सभापतींच्या कार्यपद्धतीवर नाराज असलेले १३ संचालक राजीनामा देण्याच्या तयारीत असून, ते आपले राजीनामे खिशात घेऊन फिरत आहेत. या १३ संचालकांनी सामूहिकपणे राजीनाम्याच्या पत्रावर स्वाक्षरी केल्या आहे. गुरुवारी पालकमंत्री गुलाबराव पाटील हे जिल्ह्याच्या बाहेर असल्याने संचालकांनी आपले राजीनामे स्वतःजवळ ठेवले. दरम्यान, पालकमंत्री गुलाबराव पाटील हे आज जिल्ह्यात येणार असून, त्यांची भेट घेतल्यानंतरच राजीनामा देण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. सभापतींच्या कारभाराविरोधात सदस्य आक्रमक असून, गेल्या पाच वर्षांत तीन सभापतींविरोधात संचालकांनी अविश्वास आणला आहे. आता येत्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नवीन समीकरणे तयार होण्याची शक्यता आहे.

कार्यकारी मंडळाची संपली आहे मुदत -

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यकारी मंडळाची मुदत सप्टेंबर २०२० मध्ये संपली आहे. मात्र, कोरोनामुळे विद्यमान संचालक मंडळाला मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे सर्व संचालकांनी राजीनामे दिल्यास सभापतींचे अधिकार रद्दबातल होतील व बाजार समितीवर निवडणूक लागेपर्यंत प्रशासक नेमण्यात येण्याची शक्यता आहे.

'कॉम्प्लेक्स'च्या बांधकामानंतर बदलले बाजार समितीचे राजकारण -

बाजार समितीच्या आवारात शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीने विकासक पराग कन्स्ट्रक्शनशी करार केलेला आहे. या कामाला सुरुवात झाल्यापासून बाजार समितीतील राजकारण 'कॉम्प्लेक्स' भोवती फिरत आहे. या 'कॉम्प्लेक्स'च्या बांधकामाला मनपा प्रशासनाने परवानगी नाकारली होती. विकास नियंत्रक नियमावलीच्या आधारातील निकषात बाजार समितीचे प्रस्तावित संकूल बसत नसल्याने ही परवानगी नाकरण्यात आल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे. पुणे येथील नगररचना विभागाकडून या कामाला मंजुरी आणण्यात आली. त्यातच १८४ दुकानांची परवानगी असताना १९२ दुकाने बांधण्यात आली आहेत, अशी चर्चा होती. या 'कॉम्प्लेक्स' मध्ये दुकाने घेण्यावरूनच संचालकांमध्ये वाद सुरु असून, त्याचे पडसाद वेळोवेळी पाहायला मिळत आहेत. २०१७ मध्ये तत्कालीन सभापती प्रकाश नारखेडे यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणण्यात आला. त्यानंतर २०१९ मध्ये लक्ष्मण पाटील यांच्यावर तर आता कैलास चौधरी यांच्या विरोधात सर्वपक्षीय संचालक एकटवले आहेत.

गाळ्यांसाठी सुरू आहे खटाटोप -

'कॉम्प्लेक्स'मध्ये गाळे मिळावेत, यासाठीच सर्व संचालकांमध्ये एकप्रकारे स्पर्धाच सुरू असून, त्यावरून हे खटके उडाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आताही 'कॉम्प्लेक्स'च्या मुद्द्यावरून सभापती व संचालकांमध्ये वादाची ठिणगी पडल्याचे बोलले जात आहे. काही गाळे परस्पर विक्री केल्याचाही आरोप काही संचालकांकडून केला जात असून, याबाबत पालकमंत्र्यांकडे सभापतींची तक्रार केली जाणार आहे.

पालकमंत्री संचालकांची नाराजी दूर करतील का?

सभापती कैलास चौधरी हे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे अंत्यत निकटवर्तीय मानले जातात. अशा परिस्थितीत संचालकांकडून सभापतींविरोधात भूमिका घेतल्याने पालकमंत्री नाराज संचालकांची नाराजी दूर करतात की नाही? याकडे लक्ष लागले आहे. पाळधी येथील निवासस्थानी जावून संचालक पालकमंत्र्यांची भेट घेणार असून, या बैठकीनंतरच संचालक आपली भूमिका जाहीर करणार आहेत. प्रभाकर सोनवणे, यमुना सपकाळे, शशिकांत बियाणी, नितीन बेहळे या संचालकांनी अद्याप आपली भूमिका जाहीर केलेली नाही.

असे आहे पक्षीय बलाबल -

एकूण संचालक - १८
शिवसेना - ६
भाजप - ५
शेतकरी विकास पॅनल - ४
व्यापारी संचालक - २
अपात्र - १

राजीनामा देण्याचा तयारीत असलेले संचालक -
भाजप - ५
शिवसेना - ५
शेतकरी विकास पॅनल - ३

ABOUT THE AUTHOR

...view details