जळगाव -वाळुमाफियांच्या टोळीवर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकावरच वाळुमाफियांनी डंपर घातल्याची धक्कादायक घटना घडली आहे. धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथील गिरणा नदीपात्रात गुरुवारी पहाटे अडीच ते साडेपाचच्या दरम्यान, हा थरार घडला. सुदैवाने या घटनेत पोलीस कर्मचारी बचावले आहेत. याप्रकरणी जळगाव महापालिकेचे भाजप नगरसेवक व ठेकेदार कुलभूषण पाटील यांच्यावर संघटीत गुन्हेगारीसाठी प्रवृत्त केल्याचा तर ११ जणांविरुद्ध प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत वाळू वाहतूक करणारे ५ डंपर पोलिसांनी पकडले आहेत.
जळगावात वाळुमाफियांनी पोलीस पथकावर घातले डंपर; भाजप नगरसेवकासह १२ जणांवर गुन्हा - भाजप नगरसेवक वाळू माफिया
वाळू माफियांविरोधात कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर डंपर घालून घातपात करण्याचा प्रकार समोर आला आहे. धरणगाव तालुक्यातील गिरणा नदीपात्रात ही घटना घडली आहे. या वाळू माफियामध्ये भाजप नगरसेवकाचा समावेश असल्याची माहिती समोर आली असून १२ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी दोन दिवसांपूर्वीच गिरणा नदी पात्रातून होत असलेल्या अवैध वाळू उपशाला प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजना केल्या होत्या. त्यानुसार गुरुवारी धरणगाव तालुक्यातील बांभोरी परिसरातील गिरणा नदी पात्रात पोलिसांच्या पथकाने कारवाई केली.
डंपर चालकांच्या आवळल्या मुसक्या-
पोलीस पथकाने एका ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये बसून पहाटे अडीच ते साडेपाचपर्यंत वाळू चोरणाऱ्या टोळीला पकडण्यासाठी नदीपात्रात सापळा रचला. यावेळी पाच डंपरवरील चालक प्रमोद सुभाष चव्हाण (रा. सावदे प्र.चा, ता. एरंडोल), अनिल योगराज सपकाळे (रा. आव्हाणे, ता. जळगाव), भगवान सोमा सोनवणे (रा. बांबोरी प्र.चा. ता. धरणगाव), सचिन शंकर पाटील (रा. शेंदुर्णी, ता. जामनेर), सिद्धार्थ अशोक अहिरे (रा. पिंपळकोठा प्र.चा. ता. एरंडोल), दुचाकीवरून वाॅच ठेवण्याचे काम करणारे दोन तरुण मुकुंदा राजू पाटील (रा. वैजनाथ, ता. एरंडोल), दीपक धनराज पाटील (रा. वैजनाथ, ता. एरंडोल) अशांना ताब्यात घेण्यात आले.
पोलिसांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न-
या कारवाईदरम्यान डंपर चालक सिद्धार्थ अहिरे याने पोलिसांच्या अंगावर डंपर घालून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने यात कोणत्याही पोलीस कर्मचाऱ्याला दुखापत झाली नाही. ताब्यात घेतलेले सर्व डंपर धरणगाव तहसील कार्यालयात सुरक्षेच्या कारणास्तव जमा करण्यात आले आहेत.
नगरसेवक कुलभूषण पाटलांवर संघटीत गुन्हेगारीचा गुन्हा-
या गुन्ह्याच्या तक्रारीत ठेकेदार कुलभूषण पाटील (रा. जळगाव) यांच्यावर संघटीत गुन्हेगारीचा गुन्हा दाखल झाला आहे. 'मला पैसे द्या, मी नदीपात्रातून चोरलेली वाळू माझ्या ठेक्यावरून आणली, असे सांगून तुम्हाला त्याच्या पावत्या देतो', असे सांगत पाटील यांनी सर्वांना एकत्र आणले आणि संघटीत गुन्हेगारी करण्यास प्रवृत्त केले, असे निष्पन्न झाल्याने त्यांच्यावर संघटीत गुन्हेगारीसाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२५ लाख १८ हजारांचा मुद्देमाल जप्त-
या गुन्ह्यात एकूण १२ आरोपींविरुद्ध धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, २५ लाख १८ हजारांचा एकूण ऐवज जप्त करण्यात आला आहे. त्यात ५ डंपर, १ ब्रास वाळू दुचाकी, मोबाईल असा मुद्देमाल आहे. यातील ५ चालक व दुचाकीवरील २ पंटर यांना अटक झाली आहे. या कारवाईने वाळू माफियांच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे.