हिंगोली- जिल्ह्यात तापमानाचा पारा चक्क ४४ ते ४५ अंशावर पोहोचला असून असह्य उन्हाचे चटके जाणवत आहेत. अशात उष्माघाताने एका युवकाचा बळी गेल्याची घटना बुधवारी घडली. संदीप रमेश शिंदे (२०, रा. जडगाव) असे मृत युवकाचे नाव आहे. संदीप हा घरच्यांना लगेच गुरांचे चारापाणी करून परत येतो म्हणून शेतात गेला होता. परंतु, तो परत आलाच नाही.
'जनावरांना चारापाणी करुन येतो', शेतात गेलेल्या हिंगोलीतील तरुणाचा उष्माघाताने मृत्यू
हिंगोलीत उष्माघाताने एका युवकाचा बळी गेल्याची घटना बुधवारी घडली. संदीप रमेश शिंदे असे मृत युवकाचे नाव आहे. संदीप हा घरच्यांना लगेच गुरांचे चारापाणी करून परत येतो म्हणून शेतात गेला होता. परंतु, तो परत आलाच नाही.
मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात उष्णतेची लाट पसरली आहे. त्याच धर्तीवर हिंगोलीतल्या तापमानातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली. तीन ते चार दिवसापासून तर तापमानाचा पारा चक्क ४४ ते ४५ अंशावर पोहोचला. वाढत्या तापमानामुळे उष्माघात होऊन जिल्ह्यात आतापर्यंत ६ जणांचा बळी गेला आहे. मृत संदीप हा शेतामध्ये बांधलेल्या गुरांना चारापाणी करण्यासाठी गेला होता. तो चारापाणी करून उन्हातच वापस आला. यावेळी त्याने पाणी पिले आणि एका जागी बसला. दरम्यान, त्याला अस्वस्थ वाटू लागले. ही बाब त्याने आपल्या नातेवाईकाला सांगितली. त्यामुळे नातेवाईकांनी त्याला रुग्णालयात हलविले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्याच्या अगोदरच संदीपचा मृत्यू झाला होता.
या घटनेने संदीपचे कुटुंब शोकसागरात बुडाले. तोंडावर येऊन ठेपलेल्या खरिप पेरणीच्या तयारीला शेतकरी लागले आहेत. मात्र, वाढत्या उन्हामुळे शेतीची कामे देखील करणे जिकिरीचे बनले आहे.