हिंगोली -हरभऱ्याची पेरणी करत असताना ट्रॅक्टर विहिरीत पडून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सचिन मिराशे असे या तरुणाचे नाव आहे. तो सेनगाव तालुक्यातल्या कसबे धावंडा येथील रहिवासी होता. पेरणी करत असताना ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला.
सचिन मंगळवारी ट्रॅक्टरच्या साह्याने हरभरा पेरणी करत होता. तेव्हा ट्रॅक्टर रिव्हर्स घेताना त्याचा वाहनावरील ताबा सुटला. ट्रॅक्टरवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न त्याने केला, मात्र यश आले नाही. ट्र्रॅक्टर शेजारी असलेल्या विहिरीत कोसळले. या दुर्घटनेमध्ये चालकाचा जागीच मृत्यू झाला. सचिन हा मराठा शिवसैनिक सेनेचा जिल्हा उपाध्यक्ष होता. घटनेची माहिती मिळताच कळमनुरी पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला. सचिनच्या मृत्यूने गावावर शोककळा पसरली आहे.