महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Aug 17, 2020, 4:41 PM IST

ETV Bharat / state

येलदरी धरणाचे दहा तर सिद्धेश्वर धरणाचे आठ दरवाजे उघडले; शेतशिवारात शिरले पाणी

जोरदार पाऊस झाल्याने यलदरी धरणाचे आठ तर सिद्धेश्वर धरणाचे आठ दरवाजे उघडण्यात आले आहेत. या धरणाचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात शिरले आहे.

hingoli
धरणाचे उघडलेले दरवाजे

हिंगोली - जिल्ह्यामध्ये तीन ते चार दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असल्याने हिंगोली जिल्ह्यातील सिद्धेश्वर धरण हे शंभर टक्के भरले आहे. तसेच येलदरी धरण देखील शंभर टक्के भरल्याने येलदरी धरणाचे दहा दरवाजे उघडले असून त्या पाठोपाठ आता सिद्धेश्वर धरणाचे देखील आठ दरवाजे उघडले आहेत. दोन्हीही धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जातोय. पूर्णा नदी ही दुथडी भरून वाहत आहे. नदीकाठच्या 50 पेक्षा जास्त गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

येलदरी धरण हे तीन ते चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे अन खडकवासला धरणातील पाणी येलदरी धरणात येत असल्याने, या वर्षी 100 टक्के भरले आहे. त्यामुळे धरणाचे दहाही दरवाजे उघडण्यात आले आहेत. येलदरी धरणातून विसर्ग होणारे पाणी हे सिद्धेश्वर धरणात येत असल्याने, सिद्धेश्वर देखील 100 टक्के भरले आहे. त्यामुळे सिद्धेश्वर धरणाचे अगोदर 6 अन आता 8 दरवाजे उघडलेले आहेत. या धरणातून जवळपास 7 हजार 300 क्युसेक पाणी हे पूर्णा नदीमध्ये विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे पूर्णा नदी लगत असलेल्या शेत शिवारामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. तर काही शेतकऱ्यांची शेती अवजारे देखील वाहून गेले आहेत.

शेतातील पाणी पाहताना हतबल शेतकरी

औंढा नागनाथ तालुक्यातील गोजेगाव येथील एक व्यक्ती रविवारी सायंकाळपासून पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेला आहे. त्याचा रेस्क्यू टीम शोध घेत आहे. अजून तरी सदर व्यक्तीचा शोध लागलेला नाही. एकंदरीतच कोरोनामुळे हैराण झालेला शेतकरी हा पुराच्या पाण्यामुळे देखील हवालदिल होऊन बसला आहे. यावर्षी काही केल्या शेतकऱ्याच्या मागील संकटे कमी होत नसल्याचे धक्कादायक चित्र आहे. नदीकाठचे पिके तर पूर्णपणे खरडून गेलेली आहेत. त्यामुळे यंदा खरिपाच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट होणार असल्याची चिंता शेतकरी व्यक्त करीत आहेत.

येलदरी धरणात पाण्याची आवकही मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे पुर्णा पाटबंधारे विभागाच्या वतीने धरणाचे दरवाजे उघडले असून हे पाणी पूर्णा नदीत सोडल्याने हिंगोली प्रशासनाच्यावतीने नदी लगत असलेल्या गावातील ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

शेतशिवारातील अनेक शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी देखील पाण्यामध्ये बुडाल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे हे अतोनात नुकसान झालेले आहे. आता प्रशासन स्तरावर शेत शिवारात शिरलेल्या पाण्याचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी एवढीच मागणी शेतकरी करीत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details