हिंगोली- जिल्हा सामान्य रुग्णालयात जागतिक एड्स दिनाची तयारी मागील तीन ते चार दिवसांपासून सुरू होती. आज शहरातील मुख्य मार्गावरून काढलेल्या एड्स जनागृतीच्या रॅलीला शल्यचिकित्सक किशोर श्रीवास यांनी हिरवा झेंडा दाखविला. तसेच जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक उद्धव कदम यांनी जागतिक एड्स दिनाची शपथ दिली.
हिंगोली येथे महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी मुंबई यांच्या सुचनेनुसार जिल्हा सामान्य रुग्णालयातील एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष येथे जागतिक एड्स दिन विविध कार्यक्रम घेऊन साजरा करण्यात आला. यावेळी काढण्यात आलेल्या रॅलीत शासकीय नर्सिंग महाविद्यालय युनायटेड पॅरामेडिकल महाविद्यालय, शिवांजली महाविद्यालय, नर्सिंग स्कूल, मदर तेरेसा नर्सिंग स्कूल, जय हिंद नर्सिंग स्कूल, सरजू देवी महाविद्यालय शिवाजी महाविद्यालय, नेहरू युवा केंद्र, डॉक्टर हेडगेवार दंत महाविद्यालय आदी ठिकाणचे युवक-युवती व प्राध्यापक सहभागी झाले होते. दरम्यान, वसमत येथील बालरोग तज्ञ डॉक्टर प्रशांत सोमानी यांनी एड्सबाधित जीवन जगणाऱ्या सोळा वर्षांखालील मुलांसाठी आरोग्य संवर्धनासाठी उपयुक्त असलेली प्रोटीन पावडर देत सामाजिक बांधिलकी जोपासली. रॅली पोस्ट ऑफिस जवाहर रोड मार्गे इंदिरा गांधी चौक, पोलीस कवायत मैदान येथे पोहोचली. यानंतर सर्व युवक युवतींच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.