महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शेतात क्वारंटाईन असलेल्या मजुरांना ग्रामस्थांकडून मारहाण; गरोदर मातेच्या पोटात मारली लाथ - corona effect news hingoli

परजिल्ह्यातून गावी परतलेल्या काही नागरिकांनी स्वत:ला आपल्या शेतात क्वारंटाईन करून घेतले होते. त्यातील रस्त्याकडेला बसलेल्या दोघांबरोबर काही ग्रामस्थांचे भांडण झाले. हे भांडण ताणले गेल्याने गावातील इतर ग्रामस्थांनी शेतातील कुटुंबाला मारहाण केली. या मारहाणीदरम्यान, त्या कुटुंबातील एका गरोदर महिलेच्या पोटातही लाथ घालण्याचा संतापजनक प्रकार घडला आहे.

क्वारंटाईन असलेल्या मजुरांना ग्रामस्थांकडून मारहाण
क्वारंटाईन असलेल्या मजुरांना ग्रामस्थांकडून मारहाण

By

Published : May 28, 2020, 10:41 AM IST

Updated : May 28, 2020, 12:26 PM IST

हिंगोली -जिल्ह्याच्या वसमत तालुक्यातील हट्टा येथे मुंबईहून आपल्या गावी परतलेल्या एका कुटुंबाने स्वतःच्या शेतामध्ये क्वारंटाईन करून घेतले होते. यातील दोघेजण रस्त्यावर येऊन बसल्याने, त्यांना तेथून जाणारे दोन ग्रामस्थ रागवत पुढे निघून गेले होते. ते दोघे परत येत असताना शेतात थांबलेल्या काही जणांनी त्यांना अडवून मारहाण केली. त्या दोघांनी गावात येऊन ही बाब इतर ग्रामस्थांना सांगितल्यानंतर अनेकांनी शेतात धाव घेत त्या कुटुंबाला बदडून काढले. त्यावेळी कुटुंबातील एका गरोदर महिलेच्या पोटात लाथही मारल्याचे समोर आले आहे. ही घटना बुधवारी दुपारी अडीचच्या सुमारास घडली. या प्रकरणी परस्परविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत.

परजिल्ह्यात कामासाठे गेलेले अनेक कुटुंब कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या गावात परतत आहेत. तसेच हट्टा येथील अनेक कुटुंब मुंबई येथे कामानिमित्त गेले होते. त्यांनीही आपल्या घराकडे धाव घेतली होती. आरोग्यतपासणी केली असता डॉक्टरांनी त्यांना अलगीकरण कक्षात राहण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार हे कुटुंब गावापासून काही अंतरावर असलेल्या आपल्या शेतात गेल्या चौदा दिवसांपासून राहत होते. बुधवारी त्यांचा चौदा दिवसांचा कालावधीदेखील पूर्ण झाला होता. त्यातील दोघेजण शेताजवळच्या रस्त्याच्या कडेला येऊन बसले होते. दोन गावकरी या रस्त्याने जात असताना कडेला बसलेल्या त्या दोघांना त्यांनी हटकले. 'तुम्ही का फिरत आहात? तुमच्या शेतात जाऊन बसा,' असे सांगून ते पुढे निघून गेले होते. मात्र, ते दोघे परत येत असताना शेतात थांबलेल्या कुटुंबातील काही युवकांनी त्या दोघांना मारहाण केली.

गावात गेल्यावर या दोघांनी सदर घटना इतरांना सांगितली. त्यामुळे, गावातून अनेक गावकऱ्यांनी शेतात धाव घेऊन क्वारंटाईन असलेल्या कुटुंबातील सदस्यांना बदडले. त्यातील एका गरोदर महिलेच्या पोटात लाथ मारल्याने ती रस्त्यावर पडली होती. या प्रकरणी हट्टा पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. गोविंद भीमराव शेळके यांच्या फिर्यादीवरून सुरेश शामा जाधव, रावसाहेब शामा जाधव, राजाराम अण्णा शिंदे, शामराव जाधव, सुमन रामराव जाधव, सरिता सुरेश जाधव या सर्वांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, बेबी सुरेश जाधव यांच्या फिर्यादीवरून सोमनाथ शेळके, गोविंद शेळके, चंद्रकांत शेळके, नितीन, गौतम, राहुल शेळके, भीमा शेळके, राहुल शेळके या सर्वांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Last Updated : May 28, 2020, 12:26 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details