हिंगोली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मागील दीड महिन्यापासून पर जिल्ह्यात कामानिमित्त गेलेले कामगार अडकून पडले आहेत. लॉकडाऊन पुन्हा वाढल्याने कामगार भांबावून गेले आहेत. हाताला काम नसल्याने, पोटाची खळगी भरण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे जिवाची जराही पर्वा न करता कामगार उन्हाच्या झळा सोसत गावाकडे परतीच्या मार्गाला लागले आहेत. जिथे मिळेल तिथे खाऊन रात्र ढकलत आहेत. हैदराबाद येथून मध्यप्रदेशात निघालेल्या कामगारांनी व्यथा सांगितली. रात्रीच्या वेळी दहा ते वीस जण सोबत एकमेकांच्या सहाऱ्याने पायी प्रवास करीत आहेत.
उन्ह लागताच आराम अन् रात्र झाली की प्रवास, पायी जाणाऱ्या कामगाराने सांगितला धक्कादायक दिनक्रम - news about corona virus
लॉकडाऊनमुळे मागील दीड महिन्यापासून पर जिल्ह्यात कामानिमित्त गेलेले कामगार अडकून पडले आहेत. त्यामुळे जिवाची जराही पर्वा न करता कामगार उन्हाच्या झळा सोसत गावाकडे परतीच्या मार्गाला लागले आहेत. यांच्यातील एका कामगाराने सांगितला धक्कादायक दिनक्रम...
संपूर्ण जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. सर्वच कामे बंद झालेली असल्याने, कामानिमित्त गेलेल्या अनेक मजुरांचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. देशाच्या काना कोपऱ्यात अडकून पडलेल्या मजुरांनी लॉकडाऊन उघडण्याची प्रतीक्षा केली. लॉकडाऊन उघडला तर नाहीच उलट पुन्हा वाढल्याने कामगारांसमोर मोठे संकट उभे राहिले. लॉकडाऊन लागला तेव्हा पासून कसे बसे उपाशी तपासी दिवस ढकलले. मात्र, आता जवळ असलेली सर्वच माया पुंजी संपलेली असल्याने, आभाळ कोसळल्यासारखे वाटू लागले. शासन स्तरावर आप- आपल्या जिल्ह्यात पोहोचविण्याची व्यवस्था केली गेली आहे. मात्र, ही सर्व प्रक्रिया वेळ खाऊ असल्याने, अन इकडे आमच्या जवळ एक वेळच्या खाण्याची देखील व्यवस्था नाही, तर शासनाची सर्व प्रकिया होईपर्यंत कशी प्रतीक्षा करणार. त्यामुळे आपले आम्ही पायीच घराचा रस्ता धरला आहे. हैदराबाद येथून निघून आज नऊ दिवस लोटले आहेत. मध्यप्रदेशमध्ये पोहोचण्यासाठी अजून वीस ते पंचवीस दिवस लागण्याची शक्यता आहे.
जेथे दिल तेथे खातोय, अन उन्हाचे चटके जाणवू लागताच मिळेल त्या जागेवर मुक्काम करून जेव्हढे रात्री अंतर कापता येईल तेवढे कापतोय, जमिनीवर आंग टाकल्यानंतर प्रचंड प्रमाणात पायात भडक होत आहे. जणू काय आपले पाय जाळातच पडलेत, असा अनुभव झोप लागेपर्यंत येतोय. मात्र, काही ही असो एकदा घर गाठायचे घरी गेल्यानंतर आई वडील अन आप्तजण भेटल्यावर होणारा आनंद प्रवासाच सर्व दुःख नक्कीच विसरून जाण्यास नक्कीच मदत करेल. असा एका कामगाराने स्वतःला व त्याच्या सहकार्याला धीर दिला. आमच्या गावात गेल्यानंतर आम्ही गावापासून अंतर राखू, त्यांच्या संपर्कात अजिबात येणार नाही. फक्त सरकारला एवढीच विनंती आहे की आम्हाला आमच्या गावी जाऊ द्या.