हिंगोली - तसे आजेगाव चे राजकारण हे जुनेच! मात्र, आज पाण्यासाठी करण्यात आलेल्या आंदोलनामुळे त्या राजकारणाला खरोखर उजाळा मिळाला आहे. जिल्ह्यात पाऊसच नसल्याने आजेगाव सारखीच परिस्थिती जिल्ह्यातील इतर गावात निर्माण झाली आहे. आजेगावच्या महिलांनी यापूर्वी मोर्चा काढून पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी ग्रामपंचायतीला केली होती. मात्र, ग्रामपंचायतीने त्याची काहीच दखल न घेतल्याने, बुधवारी पुन्हा महिलांनी एकत्र येत मोर्चा काढला. तर याठिकाणी ग्रामपंयाचतीच्या दोन्ही पॅनलमध्ये वेगळेच चित्र दिसून आले. त्यामुळे गटविकास अधिकाऱ्यांनी (बीडीओ) बुधवारी गावात धाव घेऊन महिलांची कैफियत ऐकून घेतली.
हिंगोली जिल्ह्यात आज घडीला केवळ 14 टक्के पाऊस झाल्यामुळे पाणीटंचाईचे भयंकर वास्तव निर्माण झाले आहे. पावसाअभावी पिके पूर्णत: करपून गेली असून शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट तर पिण्याच्या पाण्याचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. मागील अनेक दिवसांपासून आजेगाव येथील महिला पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामपंचायतीवर मोर्चे काढत आहेत. मात्र, ग्रामपंचायत काहीच दखल घेत नसल्याने महिलांना रात्री-बेरात्री पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. आज घडीला आजगाव येथे पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत पूर्णता कोरडेठाक झालेल्या स्थितीत आहेत. त्यामुळेच महिलांनी एकत्र येत बुधवारी ग्राम पंचायतीवर मोर्चा काढला. ग्रामसेवक हजर नसल्याने महिलांनी ग्रामपंचायतीला कुलूप ठोकले. सरपंच आणि उपसरपंच यांचे दोन्ही गट समोरासमोर येत, आपापसात शिवीगाळ करत होते. सरपंचाच्या गटाने तर उपसरपंचावर चक्क महिला समोरच शिव्यांची लाखोली वाहिली. तेव्हा कुठे आजच्या परिस्थितीने आजेगाव ग्रामपंचायतीच्या राजकारणाचे बिंग फुटले.