हिंगोली - कोरोनाचा प्रादुर्भाव शहरांतून ग्रामीण भागांत पसरल्याने ग्रामस्थ हैराण आहेत. यातच गावोगाव अवैध दारूच्या विक्रीने जोर धरल्याने अनेक कुटुंबातील महिलांना संसाराचा गाडा हाकणं कठिण झालय. यालाच कंटाळून हिंगोली तालुक्यातील माळहिवरा येथील महिला पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या पायऱ्या झिजवत आहेत. अवैध दारूविक्रीवर बंदी घालण्याची मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केलीय. दारू बंद न झाल्यास 'आम्ही जीवाचे बरेवाईट करून घेऊ', असा इशारा त्यांनी दिला आहे.
अवैध दारूविक्रीवर बंदी घालण्याची मागणी महिलांनी निवेदनाद्वारे केलीय. हिंगोली तालुक्यातील माळहिवरा येथे गेल्या अनेक वर्षांपासून अवैध दारूविक्री सुरू आहे. सध्या महामारीच्या काळात दारूविक्रीने जोर धरला आहे. यामुळे रात्रीच्या वेळी या गावातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उभा होतोय. त्यामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
दारूबंदी करण्यासाठी अनेकदा पोलीस प्रशासनाला निवेद दिले आहे. मात्र तात्पुरती कारवाई करून पोलीस दारूविक्रेत्यांना मोकळे सोडत असल्याचा आरोप संबंधित महिलांनी केला आहे. यामुळे तस्करांना कोणताही धाक राहिला नसल्याचे महिलांनी सांगितले. दारूबंदीसाठी पुढाकार घेणाऱ्यांना तस्करांकडून धमक्या येत असून काही ठिकाणी मारहाणीचे प्रकार देखील समोर आले आहेत. अनेक मद्यपी घरातील भांडी-कुंडी तसेच धान्य विकून दारू पीत असल्याने त्यांचे संसार रस्त्यावर येण्याची भीती आहे. त्यातच महामारीच्या काळात अनेकाच्या हातचे काम गेल्याने त्यांचा व्यसनांकडे कल वाढलाय.
कसेबसे काम करून महिलांनी मिळवलेले पैसे हे मद्यपी मारहाण करून लंपास करत असल्याने महिलांची परिस्थिती आणखी खालावली आहे. आता पोलीस प्रशासनाने लक्ष घालून दारूविक्री बंद न केल्यास आम्ही गळफास घेऊन स्वत:ला संपवणार असल्याचा इशारा महिलांनी दिला आहे.