हिंगोली - सध्या कोरोनामुळे प्रशासन जीव ओतून काम करत आहे. आशा परिस्थितीत सर्वांनाच जबाबदाऱ्या देखील दिल्या आहेत. मात्र, एका गावात चक्क पोलीस पाटील असलेली महिला लग्न करून सासरी गेली, अन् तिचा कारभार भाऊ करत असल्याचे कोरोनाच्या परिस्थितीत उघड झाले. नेहमीच गैरहजर असलेल्या महिला पोलीस पाटीलला उपस्थित राहत नसल्याबाबत प्रश्न विचारले असता वरिष्ठांना उद्धट उत्तरे देत असल्याचा अहवाल पोलिसांनी दिला. त्यानंतर उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे यांनी संबधीत पोलीस पाटील महिलेला तडकाफडकी निलंबीत केले. शिवाय 24 तासात खुलासा मागविला आहे. तरन्नुम सल्लातुला शेख, रा. कळमकोंडा ता. कळमनुरी असे या महिला पोलीस पाटीलचे नाव आहे.
माहितीनुसार, तरन्नुम शेख यांची 2019 मध्ये कळमकोडा येथे पोलीस पाटील म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, 2020 मध्ये तिचा विवाह होऊन ती आपल्या सासरी परभणी येथे राहत होती. तर इकडे त्यांच्या अनुपस्थित त्यांचा भाऊ पोलीस पाटलाचा कारभार बघत असे. वास्तविक पाहता पोलीस पाटील हे मुळात ग्रामस्थ अन् प्रशासन यांच्यातील दुवा आहे. मात्र, ही महिला पोलीस पाटील, बिट जमादार किंवा कोणत्याही प्रशासकीय अधिकारी असे कुणालाही गेल्या चार महिन्याच्या काळात भेटली नाही. एवढेच नव्हे तर ती ग्रामस्थांना देखील प्रमाणपत्र घेण्यासाठी परभणी येथे बोलावत असे. तसेच, ग्रामपंचायतमध्ये ज्यांना-ज्यांना प्रमाणपत्र हवे असेल त्यांची प्रमाणपत्र ठेवायला सांगून आल्यानंतर स्वाक्षरी करून देते, असा राजेशाही थाट सुरू होता. या प्रकाराला ग्रामस्थ हैराण झाले होते. मात्र, तेव्हा कोणी तेवढे गांभीर्याने घेतले नव्हते.